मराठा मोर्चात हिंसाचार पसरवणार्‍या तीन तरुणांना गोव्यात अटक

सामना ऑनलाईन । पणजी
२५ जुलै रोजी मराठा आरक्षणासाठी कोपरखैराणे येथे काढलेल्या मोर्चात हिंसाचार करणार्‍या तरुणांना गोव्यातून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखा आणि कळंगुट पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई पार पडली. २५ जुलै रोजी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावेळी भुषण आगसकर, आशिष काळे चंद्रशेखर पाटील या तरुणांनी मोर्चात घुसून हिंसाचार केला.

नवी मुंबईत त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले, परंतु ते नवी मुंबईतून फरार झाले होते. नवी मुंबई पोलिसांना ते गोव्यात लपलेल्याची माहिती कळाली. नवी मुंबई पोलिसांनी कळंगुट पोलिसांना सर्व माहिती पूरवून पुढील कारवाई करण्यास सांगितले. पोलीस इन्स्पेक्टर जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर सिताराम मलिक, ऋषीकेश पाटील, पोलीस शिपाई विद्यानंद आमोणकर आणि महेंद्र चारी यांनी एका हॉटेलमधून या तरुणांना ताब्यात घेतले. या तरुणांवर खुनासह इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.