बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी

सामना ऑनलाईन । संगमेश्वर

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी येथे घडली. मुर्शी सुवरेवाडी येथे शनिवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. येथील स्थानिक रहिवासी तुकाराम शिवगण यांच्या घराचा मागील दरवाजा उघडा राहिला. त्या दरवाजातून अचानक एक कुत्रा शिवगण यांच्या घरात घुसला आणि त्याच्या पाठोपाठ एक बिबट्याही घरात घुसण्याच्या तयारीत होता. मात्र, बिबट्याची चाहूल लागून जाग आलेल्या शिवगण यांनी दार लावून घेण्याचा प्रयत्न केला.

या प्रयत्नात बिबट्याने त्यांच्या हाताचा चावा घेतला. त्यामुळे शिगवण यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारे गणपत सुवरे आणि रामचंद्र सुवरे हे त्यांच्या मदतीला धावून आले. पण, बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यामुळे गणपत यांच्या डोक्याला तर रामचंद्र यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या तिघांनाही रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या आधी संगमेश्वर तालुक्यातील काटवली ढोसलवाडी येथे गत आठवड्यात बिबट्याने कुत्र्याचा पाठलाग करताना घरात घुसून तिघांना जखमी केले होते. पाठोपाठ अशा घटना घडू लागल्याने संगमेश्वर तालुक्यात घबराट पसरली आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नये तसेच घराचे दरवाजे उघडे ठेवू नयेत असे आवाहन प्राणी-पक्षी मित्रांनी केले आहे .