भाताणे, देवबांधमधील अनाथ मुलांसाठी तीन हजार किलो धान्य ,कोकणकट्टा संस्थेचा अनोखा उपक्रम

170
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन ,ठाणे

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱया कोकणकट्टा या संस्थेने विलेपार्ले येथे माणुसकीची अनोखी भिक्षा फेरी काढून तीन हजार किलो धान्य तसेच अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळवल्या. या धान्याचे व वस्तूंचे वाटप भाताणे व देवबांध येथील अनाथ मुलांना करण्यात आले.

‘कोकणकट्टा’ संस्थेने काढलेल्या भिक्षा फेरीमध्ये तीन हजार किलो धान्य जमा झाले. त्यात तांदूळ तसेच डाळीचा समावेश आहे. त्याशिवाय सतरंज्या, शूज, टॉवेल, बिस्किटे या वस्तूही मिळाल्या. विरारच्या भाताणे गावातील साई आधार या संस्थेला दीड हजार किलो धान्य व साहित्य देण्यात आले. तर उर्वरित दीड हजार किलो धान्य मोखाडय़ातील देवबांध येथे सह्याद्री संस्थेला देण्यात आले. यावेळी विशाल परुळेकर यांनी अनाथालयाची माहिती दिली. वनभोजन करून अनाथ मुलांना एकतेचा मूलमंत्र दिला.

देवबांध येथेही अनाथ मुलांना मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमासाठी उदय कौलकर, दया मांडवकर, संजय पुरंदरे, सुजित कदम, सतोष कदम, श्रीपाद डंके, जयवंत घावरे, संजय शिवगण, राजू चव्हाण यांनी परिश्रम घेतले. ‘कोकणकट्टा’चे संस्थापक अजित पितळे यांनी हा सामाजिक उपक्रम अखंड सुरू राहण्यासाठी दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन केले. श्री स्वामी समर्थ मठ, ओम शांती बाल मित्र मंडळ, ओम सत्यम क्रीडा मंडळ, साई सेवक आंबेवाडी, पार्ले वल्फेअर, दुर्वांकुर युवा मंडळ आदी संस्थांनी सहकार्याचा हात पुढे केला.

आपली प्रतिक्रिया द्या