कुलाबा किल्‍ल्‍यावरील तोफांना जीवदान, सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम

3

सामना प्रतिनिधी । अलिबाग 

सरखेल कान्‍होजीराजे आंग्रे यांच्‍या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अलिबागजवळच्‍या समुद्रातील कुलाबा किल्‍ल्‍यावरील 3 दुर्लक्षित तोफांना जीवनदान मिळाले आहे. सह्याद्री प्रतिष्‍ठानने या तोफांसाठी तोफगाडे उपलब्‍ध करून दिले असून या तीनही तोफा या तोफगाड्यांवर व्‍यवस्थित ठेवण्‍यात आल्‍या आहेत. आज या तोफगाड्यांचे लोकार्पण करण्‍यात आले. यावेळी उपस्थित शेकडो शिवप्रेमींनी भंडारा उधळत जय भवानी जय शिवाजी असा जयघोष केला. पारंपारिक वेषात ढोलताशांच्‍या जगरात मिरवणूक काढत शिवभक्‍तांनी आनंद व्‍यक्‍त केला. यावेळी शाहिरांनीही शिवरायांचा व संभाजी महाराजांचा पोवाडा गाऊन उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी आमदार मनोहर भोईर, सरखेल कान्‍होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, येसाजी कंक यांचे वंशज आकाश कंक, सत्‍यशील राजे दाभाडे राजनाथ गरूड, स्‍वातंत्रवीर सावरकर यांचे वंशज रणजीत सावरकर, भाजपाचे प्रवक्‍ते केशव उपाध्‍ये आदिंसह सह्याद्री प्रतिष्‍ठानचे कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी, गडप्रेमी मोठया संख्‍येने हजर होते.

सह्याद्री प्रतिष्‍ठानचा उपक्रम शब्‍दातीत असल्‍याची भावना रघुजी आंग्रे यांनी व्‍यक्‍त केली. यापुढेही असे उपक्रम सुरूच ठेवण्‍याचा मानस असल्‍याचे सह्याद्री प्रतिष्‍ठानतर्फे सांगण्‍यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले तसेच किल्यावर असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूचे जतन व संरक्षण करणे गरजेचे आहे. याच उद्देशाने सह्याद्री प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतला आहे. कुलाबा किल्यात असलेल्या 3 तोफा ह्या दुर्लक्षित झाल्या होत्या. त्या इतिहासाची साक्ष असून त्याचे जतन होणे गरजेचे आहे. यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे तोफगाड्या बनून त्या कुलाबा किल्यावर आणल्या. त्यानंतर त्यावर दुर्लक्षित राहिलेल्या तोफा विराजमान करून मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा या तोफांना गतवैभव प्राप्त झाले आहे.