सराव करताना पिस्तुलातून गोळी सुटून तीन महिला कॉन्स्टेबल जखमी

सामना ऑनलाईन । अलिबाग

गोळीबाराचा सराव करताना मुंबई पोलीस दलातील तीन महिला कॉन्स्टेबल व एक कॉन्स्टेबल जखमी झाल्याची घटना अलिबाग येथील परहुरमधील गोळीबार सराव मैदानावर घडली. नीलम थोरके (२५), सुरेखा वावधने (२३), स्वप्नाली आपटे (२३) व प्रशिक्षक रविंद्र मदने (४४) अशी जखमी झालेल्या कॉन्स्टेबलची नावे आहेत. या चारही जणांवर मुंबईच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात केली आहे.

तालुक्यातील परहुर गावातील मैदानावर पोलीस दलातील रायगड, नवी मुंबई, मुंबई येथील पोलीस कर्मचाऱ्यांना फायरिंगचे प्रशिक्षण दिले जाते. याच मैदानावर सोमवारी सरावासाठी मुंबईतील ११५ जणांची पोलीस टीम आली होती. सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास पोलीस टीमने गोळीबाराचा सराव सुरू केला. दुपारी दीडच्या सुमारास नीलम थोरके हिचा सराव सुरू होता. यावेळी पिस्तूलने चार फायरिंग केल्यानंतर पाचव्या फायरिंगला पिस्तूल लॉक झाली. पिस्तूल पुन्हा लोड करत असताना पिस्तूलचा खटका मागे खेचण्याचा प्रयत्न करताना अचानक पिस्तूलमध्ये अडकलेली पाचवी गोळी बाहेर पडून समोरच्या भिंतीवर आदळली. या घटनेत भिंतीचे कपचे उडून नीलम थोरके हिच्या कमरेत तर सुरेखा काकधने, स्वप्नाली आपटे व रविंद्र मदने यांच्या पायात घुसले.