सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी तीन महिला न्यायमूर्ती

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी तीन महिला न्यायमूर्ती न्यायदानाचे काम करणार आहेत. मद्रास उच्च न्यायालयातून पदोन्नती मिळाल्यावर न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाची नुकतीच शपथ घेतली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या तीनवर पोहोचली आहे. बॅनर्जी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती आर भानुमती, न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा कार्यरत असणार आहेत.

स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९५० साली सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंत आठ महिला न्यायमूर्तींची नेमणूक करण्यात आली आहे. न्यायमूर्ती बॅनर्जी या आठव्या महिला न्यायमूर्ती ठरल्या आहेत. सर्वात पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी होत्या त्यांची नियुक्ती १९८९ मध्ये केली होती. सध्या नेमणूक झालेल्या बॅनर्जी या २३ सप्टेंबर २०२२ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. मद्रास उच्च न्यायालयापूर्वी बॅनर्जी या कोलकता उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि पुन्हा तिथेच मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. न्यायमूर्ती फातिमा बीवी यांच्यानंतर न्यायमूर्ती सुजाता व्ही. मनोहर, रूमा पाल, ज्ञानसुधा मिश्रा, रंजना प्रकाश देसाई, आर. भानुमती, इंदू मल्होत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर काम केले आहे.

विनीत शरण, के. एम. जोसेफ यांनीदेखील घेतली शपथ

इंदिरा बॅनर्जी यांच्यासह विनीत शरण, के. एम. जोसेफ यांनीदेखील न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. या तीन न्यायमूर्तींनी मंगळवारी हिंदुस्थानचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या उपस्थितीत न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. या नेमणुकीनंतर आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या २५ झाली असून सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीची मान्य पदे ३१ आहेत.