दुचाकी चोरून तिचे पार्टस् विकणारी टोळी जेरबंद

1

सामना प्रतिनिधी, मुंबई

दुचाकी चोरून तिचे पार्ट वेगळे करून ते विकणाऱया टोळीच्या चेंबूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्या चोरांकडून सात दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शीव-ट्रॉम्बे मार्गावरील शहनाज ब्युटी पार्लरसमोर पार्प केलेली होंडा डिओ चोरीला गेल्याची तक्रार हृतिक सन्नके (19) याने चेंबूर पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयप्रकाश भोसले व पोलीस निरीक्षक प्रवीण तेजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय यशवंतराव शिंदे, उपनिरीक्षक अनिल शेळके आदींच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान चोरीला गेलेल्या होंडा डिओ दुचाकीची बॉडी व काही पार्टस् काढून ते दुसऱयाच होंडा डिओ दुचाकीला बसविल्याची माहिती मिळाली. त्यामुळे दुसऱया होंडा डिओचा मालक वसिम अन्सारी (24) याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने हे पर्टस् मेकॅनिक जाफर चौधरी याच्याकडून पाच हजारांत बसवून घेतल्याचे सांगितले. या चोरी प्रकरणात पोलिसांनी जाफर चौधरी, वसीम अन्सारी, सद्दाम शेख आणि कलिम खान या चौघांना अटक केली असून त्यांचा पाच साथी मनम अन्सारी याचा शोध सुरू आहे. मनामच्या मदतीने चेंबूर, माहीम, गोवंडी, कुर्ला, माटुंगा, धारावी, आर. ए. किडवाई, वडाळा व टिळकनगर परिसरातील 11 दुचाकी चोरल्याचे जाफरने सांगितले.