ती सध्या काय करते?

शिरीष कणेकर <<[email protected] >>

आज नमू येणार आहे भेटायला.

वास्तविक मी तिला तोंडावर नमू कधीच म्हणालो नव्हतो.

पाठीवरही तिचा उल्लेख नमू असा कधी केला नव्हता. बोलण्यात तिचं नम्रता हे नावही आलं नव्हतं तर थेट नमू म्हणण्याइतकी सलगी मी कशी दाखवणार होतो? आठवीपासून अकरावीपर्यंत आम्ही एका वर्गात होतो. आम्ही दोघंही पहिल्या बाकावर बसायचो. ती मुलींच्या सेक्शनमध्ये, मी मुलांच्या सेक्शनमध्ये. मालेगावची न्यू इंग्लिश स्कूल, पाच कंदिलच्या पुढची गल्ली. वर्गातला अशोक बडवे (सेंट्रल व रॉयल या सिनेमागृहांचे मालक सोनूशेट बडवे यांचा मुलगा) शाळेच्याच तळमजल्यावर राहायचा. शाळेची घंटा ऐकू आल्यावरही तो घरातून निघालेलं चालत होतं. दोन मिनिटात तो खाली जाऊन काही खाऊन येऊ शकायचा. त्याच्या हलत्या तोंडावरून आम्ही ओळखायचो, मात्र बरं नाही असं सांगून शाळेला दांडी मारणं त्याला अवघड जायचं. ओसरीवर हुंदडताना पकडलं जायची त्याला भीती होती. मुख्याध्यापक रहाळकर सर टपूनच बसलेले असत. काशीकर सर काही कमी जासूस नव्हते. त्यांचा मुलगा शरद आमच्या वर्गात होता तरीही त्यांची जरब कायम होती. मला शरदची दया यायची. शाळेत काशीकर सर आणि घरातही काशीकर सरच. पुणतांबेकर मॅडम मात्र गरीब होत्या, प्रेमळ होत्या. त्या मला माझ्या मावशीसारख्या वाटत, पण सगळेच पिरिएडस् पुणतांबेकर मॅडम कशा घेणार? वयोवृद्ध गुप्ते सर इतके खडूस का होते मला कधीच कळू शकले नाही. ते सॅण्डलच्या आत मोजे घालून टांग्यातून शाळेत येत. माझ्यावर त्यांचा विशेष दात होता. जाता येता खेकसत. मी जातवाला म्हणून माझा राग राग करीत. (आमच्यात असंच असतं.) कदाचित मला पाहून त्यांना त्यांची दिवंगत सासू आठवत असावी. त्यांना मला सासूलाच भेटायला पाठवायचं होतं की काय कोण जाणे. त्यांची मुलगी मात्र देखणी होती. गुप्ते आडनावाच्या मुली रूपवानच असतात. माझी आईही माहेरची गुप्तेच होती. हे मी गुप्तेसरांना सांगितलं असतं तर ते माझ्याशी थोडय़ा नरमाईने वागले असते का? त्यांच्या टांग्याच्या घोडय़ाच्या जागी त्यांना मला जुंपायचं असावं. सोनावणे सर सायन्स शिकवायचे. त्यांना बहुधा प्राध्यापक व्हायचं होतं. ती हौस ते मधूनच इंग्रजीतून शिकवून भागवायचे. मधूनच ‘कळतंय ना?’ असे विचारायचे. मला मराठीतून शिकवलेलं कळायचं नाही तर इंग्रजीतून शिकवलेलं काय डोंबलं कळणार? इंप्रेशन चांगलं पडावं म्हणून मी नमूकडे बघत मान डोलवायचो. एकदा केमिस्ट्री लॅबमध्ये काहीतरी रसायन सोनावणे सरांच्या डोळय़ात गेलं. त्यांना काही दिसेनासं झालं. शिवाय वेदनाही होत होत्या. त्यांनी ठणाणा केला – ‘वाचवा रे वाचवा मला. डोळे फुटले माझे. आयुष्यातून उठलो. मला बायका मुलं आहेत हो…’ त्यांनी हा आक्रोश इंग्रजीतून करायला हवा होता. नशीब, मी हे बोललो नाही. तरीही त्यांचे डोळे खाडकन उघडले. परवा अचानक त्यांच्या मुलाचा फोन आला. मी त्याला दोनच प्रश्न विचारले, ‘ते आजही अधूनमधून इंग्रजीतून बोलतात का? त्यांचे डोळे कसे आहेत?’

अरे यार, मी नमूविषयी सांगत होतो आणि हे काय मध्येच ‘बीटिंग अराऊंड द बुश’ चालवलंय? (वास्तविक रहाळकर सर, गुप्ते सर, काशीकर सर, सोनावणे सर हे ‘बुश’ नव्हते तर डेरेदार वटवृक्ष होते. ‘बुश’ नव्हते तर ‘डोनाल्ड ट्रम्प’ होते असं म्हणू का?) सावळा वर्ण, गोल गोड चेहरा, जास्त नाही कमी नाही अशी (मला शोभणारी) बेताची उंची, गायची चांगली. ती वर्गात काही निमित्तानं गायला लागली की मी आडमाप फुलन एकबोटेकडे बघितल्यासारखं दाखवत असे. (आज नमू, तिचं दिसणं, तिचं गाणं यापेक्षा भाडोत्री मारेकऱयासारखा दिसणारा फुलन एकबोटेच जास्त आठवतो. जळली ती माझी लक्षणे!) त्या काळात मुलींशी बोलणं, त्यांच्याकडे बघून हसणं समाजात निषिद्ध मानलं गेलं होतं. एकदा काकाणी नगर वाचनालयात मी आणि नमू (अर्थातच वेगवेगळे) पुस्तक बदलायला गेलो होतो. योगायोगानं आम्ही शेजारी शेजारी उभे होतो. आम्ही ढुंकून एकमेकांकडे बघितले नाही. (मग ती शेजारी उभी आहे हे कसं कळलं चोरा?) बोलण्याचा प्रश्नच नव्हता. ‘तू आठवडय़ाला पुस्तक बदलतेस का?’ किंवा ‘आज बागवडे सर का नव्हते आले?’ असले अत्यंत निरुपद्रवी प्रश्न जरी मी विचारले असते तरी जणू कोणा अज्ञात न्यायमूर्ती रामशास्त्र्ााr प्रभुणेंनी मला देहदंडाची शिक्षा ठोठावली असती. तो काळ भिन्न होता. तो माहोल वेगळा होता. वर्गातल्या किंवा बाहेरच्या मुलींच्या अस्तित्वाची दखल घेणं हेच विनयभंगासमान होतं. आम्ही नेमके त्या काळाच्या कचाटय़ात सापडलो व भरडले गेलो. चार वर्षांत मी नमूशी एकही शब्द बोलू शकत नाही या शेपूटघालू पुचाटपणाला काय म्हणणार? संक्रांतीला सुळे सरांकडे ती मला दिसली. दुसरीकडे बघायला तिथं फुलन एकबोटेही नव्हता.

‘कोठय़ा’वर टेबल टेनिस खेळायला जाताना समोरच तिचं घर लागायचं. माझी सहज तिच्या खिडकीकडे वर नजर जायची. अगदी सहज. एकदा रिवाजाप्रमाणे मी असाच तिच्या खिडकीकडे बघत असताना अण्णांच्या सरकारी इस्पितळातील आयाचा मुलगा मला कुत्सितपणे म्हणाला, ‘बघ, बघ बघत रहा. येईल ती.’ मी कमालीचा वरमलो. जणू जारकर्म करीत असताना संस्कृती संरक्षकांनी मला ‘रंगे हाथ’ पकडले होते. त्यानंतर तो आयाचा मुलगा दिसला तरी मी फूटपाथ बदलायला लागलो.

माझ्या टेबल टेनिसच्या टुर्नामेंटला नमू आली होती. नंतर मृणाल मावशीनं मला विचारलं. ‘ती काळीशी मुलगी कोण होती रे? तू खेळत असताना ती टाळय़ा वाजवत होती.’

काळीशी मुलगी? एवढंच नमूचं वर्णन होतं का? मग तुझं लक्ष कसं गेलं एवढं तिच्याकडे? मी काहीच बोललो नाही. नमू ही बोलण्याची गोष्ट नव्हती, ती ‘मेहसूस’ करण्याची गोष्ट होती. पण हे पांडित्य व तत्त्वज्ञान मला आज सुचतंय. तिच्याशी एक शब्द बोलण्याचं धाडसही मी दाखवू शकलो नव्हतो हा शरमिंदा करणारा इतिहास मी कसा बदलणार होतो?

नमू मला आवडायची का? नाही म्हणजे हो. मी तिच्यावर लाइन मारायचो का? घ्या. चिटणीस सरांच्या चित्रकलेच्या तासाला मला साधी सरळ लाइन मारता यायची नाही, मी काय लाइन मारणार? मनात कुठेतरी ‘कुछ कुछ होता है’ मात्र होतं.

आठ-पंधरा दिवसांपूर्वी मला एकाएकी नमूच्या भावाचा फोन आला. (नमूला भाऊ होता?) ‘वर्गातली नम्रता आठवते का?’ त्यानं विचारलं.

‘अर्थातच’, मी म्हणालो. मी विसरलो नव्हतो. आठवतही नव्हतो.

नमू मला भेटायला येणार आहे असं तिचा भाऊ म्हणाला. साठ वर्षे उशीरच नाही का झाला? खैर, देर आए दुरुस्त आए!

बघा, दारावरची बेल वाजली.  नमूचीच बेल. आम्हाला एकमेकांना पाहून आनंद होईल की निराशा होईल? वेट. मी दार उघडतो. मी दाराच्या आत आहे, ती दाराच्या बाहेर आहे. तीही थकली असेल? तिलाही कवळी लागली असेल? तिचेही केस पांढरे झाले असतील? ती नातवंडांना घेऊन आली असेल…