मृत बिबट्यासोबत सेल्फी काढायला गेले आणि…

सामना ऑनलाईन। जयपुर

सेल्फीचा नाद जीवावर बेतू शकतो हे माहीत असून देखील सेल्फीचे क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. राजस्थानमधील उदयपूर येथेही दोन तरुणांना असाच अनुभव आला आहे. रस्त्याला लागून असलेल्या गटारीत एक बिबट्या जखमी अवस्थेत पडला होता. पण तो मृत असल्याचे समजून दोन मित्र त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गेले. पण अचानक बिबट्याने त्यातील एकावर झडप घातली. मात्र सुदैवाने तो बचावला आहे.

राजस्थानमधील उदयपुर येथे मोटारबाईकवरून दोघे मित्र गावाकडे जात होते. त्याचवेळी त्यांची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात गेली. तिथे एक बिबट्या पडलेला बघून तो मृत असावा असा त्यांचा समज झाला आणि सेल्फी काढण्यासाठी ते त्याच्याजवळ गेले. एका मित्राने मोबाईल कॅमेरा ऑन केला तर दुसरा बिबट्याच्या मागे उभा राहिला. त्याचवेळी निपचित पडलेल्या बिबट्याने कूस बदलली व डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्याने मोबाईल हातात पकडलेल्या तरुणावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्याने भयभीत झालेला तरुण मदतीसाठी आरडाओरड करू लागला. तर मित्राला तिथेच सोडून दुसऱ्या तरुणाने तिथून पळ काढला.

दरम्यान तरुणाचा आवाज ऐकूण काहीवेळानंतर गावकरी तिथे पोहचले. बिबट्याच्या तावडीत तरुण सापडल्याचे बघताच गावकऱ्यांनी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. यामुळे भांबावलेल्या बिबट्याने तरुणाला तिथेच टाकून पळ काढला आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर वनविभागाला पाचारण करण्यात आले. बिबट्या जवळपास असल्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी एका घराच्या मागे बिबट्या लपल्याचे अधिकाऱ्यांना दिसले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला पिंजऱ्यात बंद केले. गाडीची धडक बसल्याने बिबट्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता .त्याला हालचाल करता येत नव्हती. यामुळेच तरुण थोडक्यात बचावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.