सह्याद्रीचा वाघ

अनंत सोनवणे,[email protected]

पश्चिम महाराष्ट्रातला हा एकमेव व्याघ्र प्रकल्प कोयना वन्य जीव प्रकल्प आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आकाराला आला

यंदाचा मे महिना महाराष्ट्रातल्या तमाम व्याघ्रप्रेमींसाठी एक मोठी खुशखबर घेऊन आला. तब्बल आठ वर्षांच्या खंडानंतर सह्याद्रीच्या वाघानं दर्शन दिलं! त्याच्या अस्तित्वाचा भक्कम पुरावा दिला! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लावलेल्या कॅमेरा ट्रपमध्ये २३ आणि २४ मे २०१८ रोजी एका नर वाघाची छबी टिपली गेली आणि व्याघ्रप्रेमींमध्ये आनंदाची लहर उमटली.

पश्चिम महाराष्ट्रातला हा एकमेव व्याघ्र प्रकल्प कोयना वन्य जीव प्रकल्प आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आकाराला आला. पश्चिम घाटांच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे जंगल महाराष्ट्राच्या चार जिह्यांमध्ये पसरलंय. त्यात सातारा (तालुके…महाबळेश्वर, माढा, सातारा, पाटण), सांगली (तालुका शिराळा), कोल्हापूर (तालुका…शाहूवाडी) आणि रत्नागिरी (तालुके…संगमेश्वर, चिपळूण, खेड) या परिसराचा समावेश होतो. सुमारे ६०० चौ.कि.मी. जंगल कोअर, तर ५६५ चौ. कि.मी. जंगल बफर क्षेत्र मानलं जातं.

व्याघ्र प्रकल्प असूनही इथं वाघाचं दर्शन अतिदुर्लभ आहे कारण मुळात इथं वाघांची संख्याच कमी आहे. त्यातून डोंगराळ भूप्रदेशामुळे वाघ दिसणं अधिकच कठीण बनतं. तसंच हे जंगलसुद्धा अतिशय घनदाट आहे. साधारणतः २०१० पूर्वी या जंगलात वाघाचं अस्तित्व ठळकपणे जाणवायचं. २०१० नंतर कॅमेरा ट्रपमध्ये एकाही वाघाचं छायाचित्र टिपलं गेलं नाही. २०१२-२०१५ या काळात विष्ठेवरून अंदाज बांधत इथं ७ वाघ असल्याचं वन्य जीव संस्थेनं जाहीर केलं. मात्र वाघाच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा छायाचित्राच्या रूपाने यंदाच्या मे महिन्यात मिळाला.

वाघ दिसणं कठीण असलं तरी हे जंगल वन्य जीवप्रेमींनी आवर्जून भेट द्यावी असं आहे. वाघाशिवाय या जंगलात बिबल्याचाही वावर आहे. तसंच रानगवा, झिपरे अस्वल, काकर, सांबर, चितळ, रानडुक्कर, शेकरू, ताडमांजर, मुंगूस, साळिंदर, वानर इत्यादी वन्य जीव इथं पाहायला मिळतात. महत्त्वाचं म्हणजे पिसोरी किंवा उंदीर हरिण  हा हरिण प्रजातीचा अतिदुर्मिळ प्राणीही इथं दिसू शकतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळणाऱया सरपटणाऱया प्राण्यांमध्ये अजगर, घोणस, नाग, फुरसे, मण्यार, विरोळा, धामण, धुरनागीण, चापडा, घोरपड, रानसरडा, विविध प्रकारच्या पाली यांचा समावेश होतो.

पक्षीप्रेमींना या जंगलात मोठा धनेश पहायला मिळू शकतो. तसंच नीलकस्तूर, सोनपाठी सुतार, मराठा सुतार, हृदय ठिपक्यांचा सुतार, तांबडा सुतार, स्वर्गनांचण, भुवईवाली नांचण, भारद्वाज, टकाचोर, लावा, रानकोंबडा, राखी बगळा, रंगीत करकोचा, मलबार धनेश, पावशा, चातक इत्यादी पक्षीही इथं आढळतात.

या जंगलात अनेक निसर्गवाटा तयार करण्यात आल्या आहेत. या वाटांवर चालत वन्य जीव व पक्षीनिरीक्षण करता येतं. इथल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर इथं पावसाळय़ात नक्की भेट द्या.