‘टायगर झिंदा है’चा धडाकेबाज ट्रेलर रिलीज

सामना ऑनलाईन । मुंबई

सलमान खानच्या आगामी ‘टायगर झिंदा है’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफचा लढवय्या अंदाज बघायला मिळत आहे. हा ट्रेलर बघताना आपल्याला हॉलिवूड चित्रपटातील स्टंट्स बघत असल्यासारखे वाटेल.

इराक शहरात इसिस या दहशतवादी संघटनेने २५ हिंदुस्थानी परिचारिकांचे अपहरण केले असून, त्यांची सुटका करण्याची जबाबदारी सलमान खान म्हणजेच टायगरवर असते. सलमान त्या परिचारिकांची सुटका कशी करतो आणि इसिसशीच्या दहशतवाद्यांशी कसा लढा देतो हे बघण्यासारखे आहे.

या ट्रेलरमध्ये सलमान व कतरिनाचे हॉलिवूड स्टाईल स्टंट देखील बघायला मिळणार आहेत. यात सलमान बर्फाच्छादित प्रदेशात स्केटिंग करतो आहे. तर कधी मोठी रायफल घेऊन तो दहशतवाद्यांशी लढताना दिसतो आहे. कतरिना पण तिचे कराटे स्टंट्स करत दहशतवाद्यांशी दोन हात करताना दिसत आहे. या ट्रेलरमधला सलमानचा ‘शिकार तो सब करते पण असली शिकार सिर्फ टायगर करता है’ हा डायलॉग चांगलाच लक्षात राहतो.

चित्रपटाचे पोस्टर व सलमान आणि कतरिनाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची उत्सुकता भाईजानच्या चाहत्यांना लागली आहे. ब्रेकअपच्या चर्चेनंतर पहिल्यांदाच सलमान कतरिना या चित्रपटातून एकत्र आले आहेत. या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीमुळे ते दोघे पुन्हा एकत्र आल्याची देखील चर्चा आहे. एक था टायगर या चित्रपटाचा सिक्वेल असलेला हा चित्रपट २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे.