सुंदर चेहरा


सुंदर चेहरा

 • मसूर डाळीची पावडर तुपात घोटून लेप तयार करावा. हा लेप दुधात मिसळून चेहऱ्याला लावावा. सतत सात दिवस हा उपाय केल्यास चेहरा तुकतुकीत आणि सुंदर दिसतो.
 • प्रियंगु, केशर, बोराच्या बीमधील मज्जा, सुगंधी वाळा, रक्तचंदनाचे चूर्ण पाणी किंवा दुधात मिसळून चेहऱ्यावर लेप द्यावा. यामुळे चेहरा उजळतो.
 • डाळिंबाची ताजी साल मधासह वाटून लेप केल्याने चेहऱ्यावरील वांगाचे डाग दूर होतात. चेहरा सुंदर दिसतो.
 • रक्तचंदन, मंजिष्ठा, लोध्र, कोष्ठकोळिंजन, प्रियंगू, वडाचे अंकुर आणि मसूर यांचा लेप लावल्यास वांग नष्ट होऊन चेहरा सतेज होतो.
 • आठवडाभर थोडासा द्राक्षाचा रस घेतला तर निस्तेज त्वचा उजळ होण्यासाठी फायदा होऊ शकतो. द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्यानेही त्वचा उजळते.
 • मुरुमांची समस्या असल्यास लोध्र, धणे, वेखंड यांचा पाण्यात किंवा दुधात मिसळून चेहऱ्याला लेप केल्यास मुरुमे नाहिशी होतात.
 • नितळ त्वचेसाठी भरपूर पाणी प्यावे. दिवसभरात जास्तीत जास्त वेळा चेहरा गार पाण्याने स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचेवर बसलेली धूळ निघून जाऊन मुरुमे, पुळ्या येत नाहीत.
 • त्वचा निरोगी दिसण्यासाठी रोज सकाळी तुळशीचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. यामुळे रक्तशुद्धी होतेच, शिवाय त्वचा तजेलदार व्हायलाही मदत होते.
 • रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा. त्यामुळे दिवसभराची चेहऱ्यावर बसलेली धूळ निघून जाते. रात्री चेहरा धुताना ग्लिसरिन, लिंबाचा रस, गुलाबजल समप्रमाणात घेऊन हे मिश्रण चेहऱ्याला लावा. चेहरा स्वच्छ आणि टवटवीत होईल.
 • त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी लिंबाचा रस 3 ते 4 थेंब घेऊन त्यात चिमूटभर शुद्ध हळद आणि 1 चमचा काकडीचा रस घालून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. चेहरा चमकू लागेल.
 • काकडीचा रस, संत्र्याचा रस, पपईचा गर, सीताफळाचा गर यापैकी जो उपलब्ध असेल तो चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेचा काळपटपणा कमी होऊन ती मऊ व्हायलाही हे रस उपयुक्त असतात.