प्राणायम

प्राणायामाचा अभ्यास जेथे करायचा तेथे मच्छर, गोंगाट असे कोणतेही अडथळे असता कामा नयेत. प्राणायाम करणाऱ्या साधकाला पुरेशी हवा मिळेल याचीही व्यवस्था असायला हवी. ही जागा शांत असायला हवी.  साधकाला एकांत मिळायला हवा.

प्राणायामाचा अभ्यास दिवसातून चार वेळाच करण्याचा आदेश यौगिक ग्रंथांनी दिला आहे. सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि मध्यरात्री… काही ग्रंथांमध्ये मध्यरात्री वगळून उर्वरित तीनदाच अभ्यास सुचवण्यात आला आहे. प्रारंभी साधकाने सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळाच अभ्यास करायचा. त्यानंतर तीन किंवा चारदा केला तरी चालू शकतो. उष्ण आणि अतिउष्ण प्रदेशात प्राणायामाचा अभ्यास करण्याऐवजी शीत प्रदेशात प्राणायाम करणे हितावह मानले जाते. ऋतु, हवामान आणि स्वतःची प्रकृती यानुसारच साधकाने प्राणायाम करायला हवा. प्राणायामाचे प्रकार आणि प्रमाणही त्यानुसारच ठरवणे चांगलं.

प्राणायामाचा अभ्यास रिकाम्यापोटी केला पाहिजे. जेवण झाले असेल तर जेवणानंतर पाच तासांनी हलका नाश्ता घेतला असेल तर अडीच तासांनंतर करायचा. पित्त असलेल्या साधकांनी थोडे दूध पिऊन त्यानंतर प्राणायाम करायला हरकत नाही. प्राणायाम करून झाल्यानंतर लगेच जेवायचे नाही. अर्धा तास झाल्यावर जेवायला हरकत नाही. प्राणायामाचा अभ्यास करताना शरीर आणि मन शांत असायला हवे.