नवीन घर घेत असाल तर…

पूर्व दिशेला असलेला भाग शक्यतो मोकळा ठेवावा. सूर्य हा या दिशेचा स्वामी आहे. या दिशेला अडथळा असेल तर गृहस्वामी किंवा मोठ्या मुलासाठी तो हानिकारक ठरू शकतो. पूर्वेकडे देवघर, अभ्यासाची खोली किंवा ड्रॉइंग रुम ठेवता येईल.

पश्चिम दिशेचा स्वामी शनी… हा यश, प्रतिष्ठा, मानसन्मान वाढवणारा आहे. मुलांची खोली, डायनिंग रुम, स्टोअर रुम या दिशेला असाव्यात.

उत्तर दिशेचा स्वामी बुध व देवता कुबेर आहे. आर्थिक प्रगती हवी असेल तर घरातील उत्तर भागात कोणताही अडथळा नसावा. तेथे मौल्यवान वस्तू, रोख रकमेचे कपाट किंवा पाहुण्यांची खोली असावी.

दक्षिण बाजूकडील भिंती बळकट आणि बंद असाव्यात. त्या दिशेचा स्वामी मंगळ आहे. या दिशेकडील घराचा भाग इतर भागांपेक्षा उंचही असला पाहिजे. यामुळे घरात शुभ प्रभाव पडतो आणि रोजगारात उन्नती होते.

उत्तर-पूर्व (ईशान्य) या दिशेचा स्वामी म्हणजे गुरू… पूर्ण घराचा हा मालक असतो. त्यामुळे या दिशेकडील घराचा भाग मोकळा आणि स्वच्छ ठेवावा. येथे देवघर, कॉम्प्युटर रुम किंवा मुलांच्या अभ्यासाची खोली बनवणे फायद्याचे.

उत्तर-पश्चिम (वायव्य) या दिशेला वायुकोन म्हणतात. या दिशेकडे गृहदोष असेल तर घरात वादविवाद, कोर्टकचेऱ्या अशा समस्या येतात. या भागात तरुण मुलामुलींचे शयनकक्ष, गेस्टरुम किंवा पाळीव प्राण्यांची खोली बनवायची.

दक्षिण-पूर्व (आग्नेय) ही दिशा अग्निदेवतेसाठी राखून ठेवलेली असते. ही दिशा दूषित असेल तर सांसारिक, भौतिक व सुखसमृद्धी असंभव ठरते. त्यामुळे येथे स्वयंपाकघर, त्यासाठी लागणाऱया वस्तूंचे भांडार किंवा टॉयलेट बनवावे.