ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्टफोन हाताळताना…

सामना ऑनलाईन, मुंबई

स्मार्टफोन ही सध्या आजी-आजोबांचीही गरज बनली आहे. घरच्या घरून काही मागवायचे असेल तरी मोबाईल हवाच… आणि कुणाशी तरी बोलायची इच्छा झाली तरी बोलायला फोन पाहिजेच. पण हाच स्मार्टफोन नीट सांभाळला नाही तर तो खराब होऊ शकतो. फोन वापरायचा म्हणजे जास्त नेटसॅव्हीच असलं पाहिजे असंही नाही. काही गोष्टी नीट लक्षात ठेवल्या तर स्मार्टफोन खराब होण्यापासून वाचवता येतो.

मोबाईल हाताळताना चुकूनही फॉरमॅटचे बटन क्लिक करायचे नाही. अर्थात चुकून ते क्लिक झाले तरी लगेच त्यावर क्रिया होत नाही. मोबाईलच आधी त्याबाबत वॉर्निंग देतो. यस किंवा नो विचारतो. त्यामुळे उगीच काहीतरी बटने क्लिक करण्याचा मोह ज्येष्ठ नागरिकांनी आवरता घेतला पाहिजे. स्मार्टफोन खराब होण्याचे दुसरे कारण म्हणजे मोबाईल एसडी कार्डशिवाय वापरणे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना फोनची इंटर्नल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी याबद्दल काहीच माहिती नसते. आपल्या गरजेच्या फाइल्स एक्सटर्नल मेमरीमध्ये म्हणजेच एसडी कार्डमध्ये ठेवायच्या असतात. त्यामुळे गरज पडल्यास कार्ड काढून घेता येते. शिवाय फोनमध्ये सोय असतानाही एसडी कार्ड घातलेच नाही तर सगळा दबाव फोनच्या इंटर्नल मेमरीवर पडतो आणि त्यामुळे तो खराब होण्याची शक्यता जास्त असते. कारण फोटो, पीडीएफ फाइल्स, इतर डॉक्युमेंट्स फाइल्स इंटर्नल मेमरीमध्येच ठेवल्यामुळे फोनची मेमरी फुल्ल होते आणि तो काम करायचं बंद करतो. फोन मेमरी शक्यतो रिकामी ठेवायची असते. तरच तो योग्य वेगात काम करतो.

ज्येष्ठ नागरिक मोबाईल फोनचा वापर तर करतात, पण दोन-तीन दिवसांत तो एकदा तरी पूर्णपणे बंद करून पुन्हा चालू करायचा असतो. त्यामुळे फोनची क्षमता वाढते. फोनचे रिबूट किंवा शटडाऊन खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे फोटोतील कॅचे क्लिअर होतात आणि फोनची सिस्टीम रिस्टार्ट होते. फोन चांगले काम करण्यासाठी हे महत्त्वाचे असते. फोनवर निष्काळजीपणाने पाणी पडले तरीही तो खराब होऊ शकतो. फोनला ओला हात लावायचा नाही. फोनबाबत कितीही अज्ञानी असलात तरी साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. फोन पाण्यापासून दूर ठेवला पाहिजे. पाण्याचा एक थेंबही फोन डॅमेज करू शकतो.

सर्वात अखेरचे, पण खूप महत्त्वाचे म्हणजे फोन संथगतीने चालत असेल तर त्यात मालवेअर व्हायरस असू शकतो. मोबाईलच त्यामध्ये असलेल्या व्हायरसबद्दल सूचना देत असतो. त्या सूचनांकडे दुर्लक्ष करायचे नाही. फोनमध्ये एखादा चांगला ऍण्टी व्हायरस ऍप ठेवायचाच असतो. कारण त्याद्वारे मोबाईलमधला व्हायरस काढून टाकायला मदत होते.