सुट्टय़ांचा मोसम, चला फिरायला

>>प्रशांत येरम

सुट्टय़ांचा मोसम… फिरायचा मोसम… प्रवासाला निघताना काय तयारी कराल…?

मे महिन्याची सुट्टी सुरू झाली की, वेध लागतात ते भटकंतीचे. मग ती वन-डे असो वा वीक-डे… अगदी कोण कोण येणार इथपासून ते तिथे गेल्यावर काय काय करायचे याचे आडाखे बांधले जातात. जसजशी पिकनिकची तारीख जवळ येते तशी घाईगडबड व्हायला लागते. काय काय न्यायचे याची जुळवाजुळव व्हायला लागते आणि नेमकी हवी तीच गोष्ट सोबत न्यायला आपण विसरतो…

पिकनिक ही तशी काही अचानक ठरत नाही. त्यासाठी अगोदरपासून तयारी केली तर काहीच कठीण नसते. मग करायचे काय, तर आपण नक्की कुठे जाणार आहोत हे पहिले ठरवायचे. तिथल्या वातावरणाचा आढावा घ्यायचा नि निघायचे… हे जरी खरे असले तरी तिथे काय काय घ्यायचे याची एक यादी केल्यास सगळे काही विनासायास घडते. जसे, कपडे काय पाहिजेत, किती दिवसांचे घ्यायचे, अचानक तब्येत बिघडल्यास कोणती औषधे हवीत, मनोरंजनासाठी काही हवे का, तिथले क्षण टिपून ठेवायला जरी आता प्रत्येकाकडे मोबाईल असला तरी कॅमेरा लागतोच… खायला काय काय हवे… त्यात सुका खाऊ, टिकणारा खाऊ काय हवा… वगैरे वगैरे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सगळे ठेवण्यासाठी बॅगेज काय काय करायचे या सगळ्याची यादी केली की काम फत्ते…

इमर्जन्सी कॉण्टॅक्ट नंबर्स, पत्ते सोबत आणि बॅगमध्ये चटकन मिळतील असे ठेवा. काही गोष्टी बॅगमध्ये राहत नसतील तर त्या कोंबण्याचा अट्टहास टाळा. अनकम्फर्टेबल असलेले कपडे, दागिने वगैरे मौल्यवान वस्तू नेणं टाळा. चार्जर, स्पेअर बॅटरीजसुद्धा सोबत ठेवा. कॅमेऱयासाठी जास्तीचे मेमरी कार्ड, चष्मा, गॉगल, टॉर्च, मेणबत्ती-काडय़ापेटी, दोरी, पेन आणि लहान डायरी, एखादा छोटा डबा, चमचा, ग्लास, टूथब्रश, कंगवा, केसांचे तेल, शाम्पू, बॉडीवॉश, फेसवॉश, सनक्रीन लोशन, पर्फ्यूम, हॅण्ड सॅनिटायझर, कापूस, टिश्यू पेपर्स , पेपरसोप असे सामानाचे वर्गीकरण करा.

सोबत काय घ्याल

> जिथे निघाला आहात तिथे शोभतील असे कपडे घ्या. अनावश्यक कपडे घेऊन वजन वाढवू नका.

> फॉर्मल वेअर्सपेक्षा जास्तीतजास्त कॅज्युअल वेअर.

> समुद्रकिनारी स्विम सूट किंवा शॉर्टस् न्या.

> शक्यतोवर लेयर्समध्ये कपडे घ्यावेत.

> आवश्यक तेवढेच कपडे जे आपल्याला उचलणे शक्य होईल असेच कपडे घ्या.

> फ्लोटर्स, स्पोर्टस् शूज, हॉटेलवर घालायला स्लीपर्स, एक मल्टिपर्पज स्कार्फ किंवा स्टोल, शाल.

> शक्य असेल तर रोजच्या कपडय़ांची एक अशा प्रत्येक दिवसाच्या पिशव्या करायच्या. म्हणजे सगळे सामान उघडावे लागत नाही.

> उन्हात बाहेर जाणार असाल तर मुलांना आणि तुम्हीही सनक्रीन लावायला विसरू नका.

> लहान मुलांची त्वचा नाजूक असते. त्यांची त्वचा लाल होणे, त्यावर लाल चट्टे उठणे हे सर्व टाळण्यासाठी नेहमी बाहेर जाण्याच्या अर्धा तास अगोदर सनक्रीन जरूर लावा.

ही औषधे घ्याच

पाणी न प्यायल्याने होणारे डीहायड्रेशन होऊ शकते. त्यासाठी बाजारात काही औषधे मिळतात, पण ती डॉक्टरच्याच सल्ल्याने घ्या. शिवाय तुमच्या रोजच्या घेण्याचीही औषधे सोबत ठेवा. ज्यांना प्रवासात उलटय़ा होत असतील तर त्यांनी जेवण घेऊच नये. ड्रायफ्रूटस् किंवा सीलबंद पॅकेटस् वापरावेत. ओले स्निग्ध पदार्थ, गोड पदार्थ सोबत घेऊ नयेत. प्रवास सहन होत नसेल अशांनी प्रवासात आल्हाददायक गरम पेय, थंड पेय, डाळिंब रस, संत्रा, रस, लिंबू मोसंबी रस सोबत ठेवावा. लहान मुले सोबत असतील तर त्यांच्यासाठी खाऊ, त्यांची औषधे सोबत ठेवा. वयस्कर मंडळीसुद्धा तुमच्यासोबत येत असतील तर त्यांची औषधे विसरू नका. शिवाय सर्वांनाच नेहमी लागणारी औषधं जवळ असू द्या.