गोष्टी खासगीतल्या…

>>स्वरा सावंत<<

तेदिवससॅनिटरी पॅडस् स्वच्छतापॅडस् नष्ट कसे करावेत . .

सॅनिटरी नॅपकिन्स अस्तित्वात येऊन १३७ वर्षांचा काळ उलटला असला तरी अजूनही सर्व स्तरांपर्यंत सॅनिटरी पॅडस् पोहोचलेले नाहीत. इतकंच काय तर याबाबत अद्याप उघडपणे

बोलले जात नाही. स्त्रीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. शाळेपासूनच हे पॅडस् वापरायचे कसे याबाबत शिकवले जाते. मात्र ते वापरून झाल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची खबरदारीही आपणच घ्यायला हवी याबाबत मार्गदर्शन केले जात नाही. सॅनिटरी नॅपकिन्सचा विषय आजही पिशवीत गुंडाळून ठेवल्यासारखा हाताळला जातो. मासिक पाळीबाबतचा गैरसमज किंवा न्यूनगंड दूर करण्याचा जोरदार प्रयत्न सध्या होत आहे. सामाजिक माध्यमांनीही याबाबतची चर्चा, मतं मांडणे सुरू केले असून यात बॉलीवूडच्या नायिकाही आपली मासिक पाळीविषयी भूमिका स्पष्ट मांडत आहेत. सॅनिटरी नॅपकिन्सचा विषय कुजबुजत्या स्वरातून बाहेर पडत हक्काच्या आणि गरजेच्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक असेल. असे झाले तरच स्त्री एक निरोगी आयुष्य जगू शकेल.

सॅनिटरी नॅपकिन्सची एक अशीही चळवळ

मासिक पाळीदरम्यानची स्त्रीयांची स्वच्छता आणि आरोग्य हा अत्यंत नाजूक विषय. हिंदुस्थानात या गंभीर विषयाचा एका पुरुषाने विचार करणे अशक्यच. मात्र अरुणाचलम मुरुगानंदम यांनी हे ठोस पाऊल उचलले आणि सॅनिटरी नॅपकिन तयार करणाऱ्या मशीनचा शोध लागला. स्वतःच्या पत्नीला खूश करण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नाचे रूपांतर एका चळवळीत झाले आणि इथूनच सुरू झाला सॅनिटरी पॅडस्चा प्रवास.

अमित विरमानी यांनी सॅनिटरी पॅडस्चा वापर आणि स्त्रीयांच्या आरोग्याची चळवळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी यासाठी मुरुगानंदम यांच्यावर आधारित ‘मेन्स्ट्रअल मॅन’ हा माहितीपट तयार केला. या माहितीपटाला बेस्ट फिचर डॉक्युमेंटरीचे नामांकन मिळाले, तर एशिया पॅसिफिक स्क्रीन ऍवॉर्डनेही याला गौरविण्यात आले. परदेशातही या माहितीपटाने वाहवा मिळवली.

स्त्रीयांनी ‘त्या’ महत्त्वाच्या दिवसांत स्वच्छता राखून आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यावी. यासाठी सॅनिटरी पॅडस् वापरताना ती औषधांप्रमाणेच एक गरज असल्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहावे. यामुळे टय़ुबल इन्फेक्शन, ओव्हरी डिसीजपासून रक्षण होऊ शकते. पॅडस्च्या वापराबरोबरच त्याची योग्य विल्हेवाट ही आपली जबाबदारी आहे.

इकोफ्रेण्डली लोकॉस्ट मशीन्सचा पर्याय

गुजरातच्या श्यामसुंदर बेडेकर या व्यावसायिकाने काही महिन्यांपूर्वी बाजारात इकोफ्रेण्डली सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन बाजारात आणली. यामध्ये वापरलेले पॅड टाकून अवघ्या १० मिनिटांत त्याची राख बाहेर टाकता येते. ही मशीन्स काही ठिकाणी सार्वजनिक वापरात घेण्यात आली आहे. मात्र अजूनही या मशीनच्या वापराबाबत स्त्रीया अनभिज्ञ आहेत.

सॅनिटरी नॅपकिन्स वापरताना

> नॅपकिन्स वापरताना निर्जंतुक असलेले नॅपकिन्स केव्हाही चांगले.

> सॅनिटरी पॅकेटच्या बाहेर असलेले पॅडस् शक्यतो वापरू नयेत. कारण त्यावर असलेल्या सेफ्टी कोटचा वातावरणातील धुळीशी संपर्क होऊन त्यापासून इन्फेक्शन होऊ शकते.

> किमान चार तासांनी हे पॅड बदलणं आवश्यक आहे. अन्यथा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते.

> हल्ली कपडय़ापासून बनवलेले सॅनिटरी पॅडस् बाजारात मिळतात. हे पॅडस् वापरताना ते स्वच्छ धुऊन, कडक उन्हात वाळवून किंवा गरम पाण्यात स्टीम देऊन निर्जंतुक करावे लागतात.

> असे पॅडस् ठेवतानाही कोरडय़ा जागी, धूळ नसेल अशा ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता असते. जेणेकरून पुढच्या वापरावेळी यापासून कोणताही संसर्ग होणार नाही.

सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोज करताना

> वापरलेले नॅपकिन्स, टॅम्पोन्स किंवा कप्स डिस्पोज करताना ते थेट फ्लश करणे धोकादायक आहे.

> डिस्पोजेबल वॉटरचा टॅग असलेले नॅपकिन्सच फ्लश होतात.

> ऑर्डिनरी पॅडस् स्वच्छ करून फोल्ड करून ऍल्युमिनियम फॉईल पेपरमध्ये रॅप करून टाका. त्यामुळे या पॅडस्मधून बॅक्टेरिया क्रिएशनची गती मंदावते.

> पॅडस्ची विल्हेवाट लावताना फॉईल नसल्यास टॉयलेट पेपरचाही वापर करता येईल.

> सॅनिटरी पॅडस् डिस्पोजल मशीन्स आता बाजारात उपलब्ध आहेत. सार्वजनिक ठिकाणी, शाळा, हॉस्पिटल्स येथे या मशीन्स असतील तर त्याचा उपयोग करा.

प्रा. डॉ. राजश्री काटके

स्त्रीरोगतज्ञ, अधिष्ठाता, कामा रुग्णालय