…थोडं खासगी

88

डॉ. नीलिमा मंत्री, स्त्रीरोगतज्ञ

अजूनही मुंबईसारख्या शहरांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा अभावानेच आढळते. कामानिमित्त अशा ठिकाणी जावे लागले तर काय कराल?

आज कोणत्याही स्त्रीसाठी कामानिमित्त बाहेर पडणे हे अपरिहार्य आहे आणि असंख्य तास बाहेर राहावे लागते हेही न टाळता येण्याजोगे. महत्त्वाची मीटिंग, सेमिनार्स किंवा अन्य काही… या किंवा त्या निमित्ताने घरापासून, कार्यालयापासून लांब आऊटडोअर फिल्डवर जावे लागते. येथे सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे, मुंबईसारख्या ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहांचा अभाव. पोलीस महिला किंवा बाहेरच्या कामामुळे सतत फिरतीवर राहणाऱ्या स्त्रीयांना ही नेहमीच येणारी समस्या. प्रत्येकजण यावर आपआपल्या परीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असते. पण यात स्वाभाविकपणे स्वच्छतेची अनेक परिमाणे आड येतात.

घराबाहेर पडल्यावर अशी समस्या येणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. लघवी कधीच दाबून ठेवू नये, कारण त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. लघवी लागली असेल तर पुढील एक दोन मिनिटांत विसर्जित करणे चांगली गोष्ट असते. लघवी जास्त रोखून ठेवल्यास त्यातच काम करणं शक्य नसतं. जितके जास्त वेळ तुम्ही तुमची लघवी रोखून धराल तितके बॅक्टेरिया अधिक विकसित होणार हे लक्षात घ्यायला हवे. लघवी एक किंवा दोन तास रोखून धरल्याने महिला आणि तरुणींना युरीनसंबंधी समस्यांना सामोरे जावे लागले. त्याची सुरुवात मुत्राशयात दुखण्यापासून होते. कधीही जोरात आलेली लघवी रोखू नका. जेव्हा लघवी लागल्याचे वाटले तेव्हा लगेच तिला विसर्जित करा. नाहीतर यूटीआय होण्याचा धोका असतो.

काही वयोवृद्धांना खोकला आल्यावर लघवी होते. या समस्येला एसयूआय म्हणतात. सॅनेटरी पॅण्टी लायनर्स येतात. ते वापरू शकतात. त्यामुळे एरिया ड्राय राहिला तर चांगले राहते. आज लघवीला कळ आल्यास ती दाबून न ठेवता जवळच्या उपाहारगृहात किंवा रेस्टॉरेण्टमध्ये जाता येईल. कायद्यानेच उपाहारगृहांना तसे बजावण्यात आले आहे. दुसरे म्हणजे महिलांनी शक्यतो कॉटनचेच इनरवेअर वापरावेत. त्यामुळे उष्णता कमी राहते.

गर्भवतींनी जास्त काळजी घ्यावी

ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल, पाणी नसेल, दुर्गंधी असेल अशा ठिकाणी लघवीला जाणे टाळा. त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. गर्भवती महिलांनी याबाबत जास्त काळजी घ्यायला हवी. कारण त्यांना असा संसर्ग लगेच होत असतो. त्यांना संसर्ग झाला की बाळालाही तो होतो आणि बाळाची लवकर डिलिव्हरी होण्याची शक्यता बळावते.

मानसिकता

अनेकदा लघवीला जाऊन आल्यावरदेखिल लघवीला जावेसे वाटणे, सतत त्याची भीती वाटणे हे मानसिक आहे. यासाठी आपल्या मनावरच ताबा असायला हवा. किंवा अशा वेळी आपले लक्ष दुसरीकडे वळवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

बॅगेत हे हवेच!

टिश्यू, हॅण्ड सॅनिटायझर, पॅण्टी लायनर, डिस्पोजेबल पेपर सोप, टॉयलेट पीज, हॅण्ड सॅनिटायझर.

का करायला हवे?

> आपल्या कामाच्या वेळेचा अंदाज घेऊन त्या वेळेच्या थोडं आधीपासून पाणी कमी प्या.

> तहान लागल्यास जवळ संत्री, मोसंबी यासारखी फळं तसेच गुळाचा खडा ठेवावा. ते काही अंशी पाण्याचे काम करतात.

> तुम्ही ज्या जागी आहात तेथे जवळपासचे रेस्टॉरंट माहीत करून घ्या.

> कोणतीही सोय नसेल तर लघवी फार काळ धरून ठेऊ नका. जवळपासचा एखादा आडोसा पाहा. (याला पर्याय नाही.)

> मानसिक दृष्ट्या स्वतःला सक्षम आणि खंबीर ठेवा. यामुळे आपण लघवीची भावना थांबवू शकतो.

> दीर्घ श्वास घ्या.

> जवळपास जरी अनोळखी स्त्री असेल तर तिला विश्वासात घ्या.

> सगळ्यात सोपे म्हणजे मासिक पाळी नसली तरी सॅनिटरी पॅड्सचा वापर करा.

आपली प्रतिक्रिया द्या