गुणकारी कढीपत्ता

स्वयंपाकघरातील फोडणीच्या वापरासाठी प्रसिद्ध असलेला कढीपत्ता… लोह, क, अ जीवनसत्त्व आणि आयोडिनचे भरपूर प्रमाण असलेला…  म्हणूनच आरोग्याच्या अनेक तक्रारींवर रामबाण उपाय ठरणारा आहे.   

  • कढीपत्ता यकृत मजबूत करण्यास मदत करते. शरीरातील यकृत सतत काम करत असतो. तो निरोगी राहण्यासाठी आहारात नियमित कढीपत्त्याचा वापर करावा. यामुळे यकृताचे संसर्गजन्य आजार आणि जिवाणूंपासून रक्षण होते.
  • शरीरामध्ये जीवनसत्त्व ‘ए’ कमी प्रमाणात असेल तर त्याचा दृष्टीवर परिणाम होतो. कढीपत्यात ए जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता सेवन करा. यामुळे डोळ्यांच्या तक्रारी दूर होतील. नजर चांगली होईल.
  • कढीपत्त्यामध्ये केसांना मॉइश्चरायझिंग करण्याचे गुण आहेत. ज्यामुळे केस वाढीबरोबर केस मजबूत व्हायला मदत होते. यासाठी त्याच्या पानांची पावडर बनवा. आणि ती तिळाच्या किंवा खोबरेल तेलात मिक्स करा. गरम करून केसांना लावा. रात्र ठेवून सकाळी केस धुऊन टाका. केस गळणे थांबून ते दाट होतील.
  • अनेक प्रकारचे अँण्टीऑक्सिडंट आणि फेनोल्स कढीपत्त्यात आढळतात. जे कँन्सरसारख्या गंभीर आजारांवर मात करायला मदत करतात.
  • रक्तातील साखरेचे प्रमाण कढीपत्ता सेवन केल्याने कमी होते. यातील फायबर साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. मधुमेहापासून रक्षण करण्यासाठी कढीपत्ता अवश्य सेवन करा.
  • कढीपत्त्यातले तेल हे जिभेवरची चवीची संवेदना वाढवते. म्हणून पदार्थ चविष्ट होण्यासाठी कढीपत्ता वापरतात. त्यामुळे अन्न रुचकर लागते.
  • अँण्टीऑक्सीडंट, अँण्टी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल या गुणांमुळे  फंगल इन्फेक्शन आणि मुरुमे येण्यापासून रक्षण होते.
  • कढीपत्यामुळे पचनशक्ती वाढते. त्यामुळे अपचनाच्या समस्येपासून सुटका होते.
  • खोकला, सायनस किंवा कफाने त्रस्त असाल तर कढीपत्त्याचा आहारात वापर करा. हे त्रास कमी होतील. यातील जीवनसत्त्व सी, अँण्टी इन्फ्लमेटरी आणि अँण्टीऑक्सिडंट हे गुण शरीरात कफ साचू देत नाहीत.