टिप्स : मसाल्यांचा उपयोग असाही!

स्वयंपाकघरात असलेले मसाले आपल्या जेवणाची चव तर वाढवतातच, पण हे मसाले सौंदर्यातही भर पाडतात…

हळद
हळदीमध्ये प्रतिजैविकं आणि जंतुनाशकांचे गुणधर्म आहेत. याचा उपयोग उत्तम अॅण्टी एजिंग घटक म्हणूनही होऊ शकतो. जे त्वचेवरील सुरकुत्या, पिंपल्स दूर करण्यात मदत करतात. तसेच हळद हे रक्त शुद्धीसाठी उत्तम औषध मानले जाते. त्यासाठी एक ग्लास दुधात हळद टाकून प्यायल्यास शरीरातील रक्त शुद्ध होतं आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. चेहरा तजेलदार वाटतो. हळदीमध्ये बेसनाचे मिश्रण करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याची चमक वाढते.

काळीमिरी
काळीमिरी त्वेचेमधील टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी मदत करतात. काळ्यामिरीची पूड करून ती पुटकुळ्यांच्या किंवा मुरुमांच्या जागी लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. काळीमिरीची पावडर करून ते फेसपॅकमध्ये मिक्स करा आणि त्वचेवर स्क्रबसारखे वापर करा. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते आणि चेहरा कोमल दिसू लागतो. तसेच थोड्याशा दह्यात काळीमिरी पूड घालून ते मिश्रण लावल्यास मुरुमांवर त्याचा फरक दिसून येतो.

दालचिनी
खाण्याचा स्वाद वाढवणारी दालचिनी त्वचेसाठीही उत्तम मानली जाते. दालचिनीमध्ये अत्यंत उपयोगी असे जीवाणूनाशक घटक असतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. दालचिनीमध्ये ऍण्डीऑक्सिडेण्ट, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स शरीरातील रक्ताचा प्रवाह सुरळीत ठेवतात. रक्त शुद्ध करतात. यामुळे केस चमकदार आणि मजबूत होतात. तसेच दालचिनी पावडर फेसपॅकमध्ये मिक्स करून त्याचा स्क्रबसारखा चेहऱ्यावर वापर केल्यास चेहरा टवटवीत वाटतो.

बडिसोप
बडिसोप चेहऱ्याला निरोगी ठेवण्यासाठी आणि चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे करण्यासाठी गुणकारी आहे. एका पातेल्यात बडिसोप उकळवून घ्या. त्याचा रंग बदलेपर्यंत ती उकळवा. ते पाणी थंड झाल्यावर त्याने हबके मारा आणि चेहरा स्वच्छ धुवा. रक्त शुद्ध करून त्वचेला उजळवण्याचं कार्य बडिसोप करते.

जिरे
जिऱ्यामध्ये फायबर असतं. त्यातील ऍण्टीऑक्सिडेण्ट, व्हिटॅमिन्स आणि खनिजे त्वचेला निरोगी ठेवतात. त्यामुळे त्वचा निरोगी वाटते. मध आणि जिऱ्याची पूड असलेला फेसपॅक वापरल्याने त्वचा चमकदार तर होतेच, पण त्याशिवाय अतिशय मुलायमही होते. फेसमास्क बनविण्यासाठी पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिऱ्याची पूड आणि एक टेबलस्पून मध एकत्र करावे. हे मिश्रण चेहऱ्यावर दहा मिनिटे लावून ठेवावे. दहा मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा.