टिवल्या बावल्या…. चला हसू येऊ द्या !

<< शिरिष कणेकर >>

विनोद नाही, वस्तुस्थिती आहे. आता वस्तुस्थितीच विनोदी असेल तर भला मैं क्या कर सकता हूँ?

मी माझ्या सहकाऱयांसमवेत ऍमस्टरडॅम विमानतळावर उतरलो. (‘आसमानसे आया फरिश्ता’ हे गाणं माझ्या मनात वाजत होतं.) मला न्यायला आलेल्या मंडळींनी हारगुच्छ देऊन माझं स्वागत केलं. मी माधुरी दीक्षितसारखं लाजरं मंद स्मित केलं. (हे हारगुच्छ बाहेर विकले तर किती पैसे येतील हा मनातील प्रश्न मी दाबून टाकला. पाहुणा भिकारडा आहे हे आल्या आल्या त्यांना कशाला कळू देऊ? परत जायला निघेन तोवर त्यांना कळलंच असेल.) त्यांच्याकडे हारतुऱयांचा आणखी एक सेट होता. माझ्या मागून येणाऱया माणसाला त्यांनी तो दिला. तो माणूस गोंधळला, पण सुखावला. काय गडबड झाल्येय मला लगेच कळलं. (‘लग्नापूर्वी ते खूप बावळट होते’ असं माझ्या सासूबाई म्हणत. त्यांच्या लग्नापूर्वी त्यांचं लग्न होत नव्हतं असं मी म्हणतो.) ते हारतुरे त्यांनी माझ्या सहकाऱयासाठी आणले होते. माझ्या मागून येणारा म्हणजे माझा सहकारीच असणार असं ते गृहीत धरून चालले होते. मी (लग्नानंतर आलेली) हुशारी वापरली. मी त्यांची माझ्या सहकाऱयाशी ओळख करून दिली. आता गडबड त्यांच्याही लक्षात आली. (लग्नाआधी किती बावळट असतील बघा.) काय करावं त्यांना सुचेना. हारतुरे घेऊन तो गृहस्थ भांबावल्यासारखा उभा होता. हे आपल्यासाठी नसावं अशी त्यालाही आता शंका येत होती. आपले हारतुरे गेले म्हणजे आपली इस्टेट गेल्यागत माझा सहकारी कातावला होता. मुंबईत तो हारतुरे घेऊन घरी गेला असता तर त्याच्या बायकोनं त्याला विचारलं असतं, ”कुठून चोरून आणलेत?”

मला वाटतं देव स्त्रीला जन्माला घालतो व सांगतो, ‘मोठी हो. लग्न कर आणि मग पदोपदी नवऱयाचा अपमान कर, त्याला आल्यासारखं ठेच, लिंबासारखं पीळ व काकडीसारखं चीर.’ देवाची आज्ञा म्हटल्यावर बायका तिचं तंतोतंत पालन करतात. आमच्या मुलीला देवाधर्माचं खूप आहे, असं तिच्या माहेरचे सांगतात त्याचा अर्थ कळला ना? एकदा ठाण्याचे दोन वाचक कौतुकादरानं मला मोठय़ा हॉटेलात जेवायला घेऊन गेले. (वर मानधन वेगळं. म्हणजे मी जेवलो त्याचे वर मलाच पैसे). तुडुंब जेऊन, खिसा गरम करून, दातकोरण्यानं दात कोरीत रात्री मी घरी परतलो तर अर्धवट झोपेत बायकोनं मला ओरडून विचारलं, ”घातलं का त्यांनी तुम्हाला अन्न?” सकाळी मी तिच्याजवळ तिच्या बरळण्याचा खुलासा मागितला तेव्हा ती म्हणाली, ”अपमान कसला आलाय त्यात? मी साधी चौकशी केली.” देव त्यांना पर्याय देत असावा. पोथी वाचा किंवा नवऱयाचा पाणउतारा करा. त्यातही तेवढंच पुण्य आहे.

तर अॅमस्टरडॅम एअरपोर्टवर मी, माझा सहकारी, मला न्यायला आलेली माणसं व तो भांबावलेला अनामिक गृहस्थ कोंडाळं करून उभे होतो. आता पुढे कसं करायचं? तोच एकानं पुढे येऊन त्या अनोळखी माणसाच्या हातून हारतुरे जवळजवळ हिसकावून घेतले व घाईघाईनं माझ्या सहकाऱयाच्या हातात कोंबले. या उष्टय़ा सन्मानानं तो नाराज झाल्यासारखा वाटला. ”तूर्तास हे घे, नंतर तुला नवीन देऊ.” मी त्याच्या कानात कुजबुजलो. त्याचा आव असा होता की जणू दिवसभरात त्याला दहावीस हारतुरे मिळतात. हारतुरे काढून घेतलेला माणूस आपली हार स्वीकारून खालमानेनं निघून गेला. माझे हारतुरे काढून घेऊ नयेत यासाठी मी ते घट्ट पकडून ठेवले होते. कधीकाळी चुकून वाटय़ाला येणारा सन्मान असा हातातून कोण सोडेल?

विनोद नाही. वस्तुस्थिती आहे. आता वस्तुस्थितीच विनोदी असेल तर भला मै क्या कर सकता हूँ?

न्यूयॉर्क एअरपोर्टवर (याला विमानतळ म्हटलं तरी चालतं.) मी आईचं बोट सुटून गर्दीत हरवलेल्या लहान मुलासारखा भांबावून उभा होतो. मला न्यायला येणारे आलेले दिसत नव्हते. तिथल्या कृष्णधवल चेहऱयांत मी मराठी चेहरा शोधत होतो. माझ्याकडे त्यांचा नंबर होता पण फोन नव्हता. मुंबईत फोन असतो, पण नंबर नसतो. यालाच दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत असं म्हणतात. मी एका गोऱया माणसाकडे फोन मागितला. सांगावयास अत्यंत खेद होतो की, ओंगळ भिकाऱयाला किंवा लुत भरलेल्या कुत्र्यालाही आपण हुडुत-हुडुत करणार नाही तसं त्यानं मला उडवून लावलं. माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला की अरे हो, विसरलोच मी काळा होतो. (म्हणजे त्यांच्यासारखा गोरा नव्हतो.) माझ्या मनात आलं की त्याच्या अंगावर अल्सेशियन कुत्र्यासारखं गुरकावून म्हणावं, ”अरे पांढऱया, क्रिकेटमध्ये तुम्हाला लोळवलंय. मुळात तुमच्या पार्श्वभागावर लाथ मारून तुम्हाला आम्ही आमच्या देशातून हाकलून दिलं होतं, विसरलात वाटतं?” पण प्रत्यक्षात मी काही बोललो नाही. इतकं गुंतागुंतीचं विधान इंग्लिशमध्ये करणं अवघडच होतं. त्यातून इंग्लिशमधून राग, त्वेश या भावना कशा व्यक्त करतात आम्हाला सुळे मॅडमनी शिकवलंच नव्हतं. त्या आमच्यावर चिडायच्या तेव्हा मराठीतूनच डाफरायच्या ‘ए कणेकरा, बैला…’ या टाइपचं त्या बोलायच्या.

तिथून जात असलेल्या एका काळय़ा (कुच्च) बाईकडे मी फोन मागितला. म्हटलं हिची ‘काळी जादू’ बघूया. ”मीच फोन शोधत्येय.” ती हसून म्हणाली.

मी माझ्याच बॅगेवर बसून राहिलो. थोडय़ाच वेळात ती मला शोधत आली व मृदू आवाजात म्हणाली, ”तुम्हाला फोन हवा होता ना? हा घ्या.”

तिनं दाखवलेल्या माणुसकीनं मी गहिवरलो. (‘हम काले है तो क्या हुवा दिलवाले है’!) मी आयोजकांना फोन लावला.

”कुठे आहात तुम्ही?” त्यांनी विचारलं.

”एअरपोर्टवर.” मी उत्तरलो.

”कुठल्या एअरपोर्टवर?”

”न्यूयॉर्क,” त्यांना मी चर्नी रोड सांगितल्यावर कांदिवलीला उतरणारा ‘पॅशिंजर’ वाटत होतो.

”न्यूयॉर्क एअरपोर्टवर कुठे?”

”बाहेर.”

”बाहेर कुठे?”

”जिथं ‘बी’ लिहिलंय मोठय़ा अक्षरात त्याच्या खाली.”

”मीही ‘बी’च्या खालीच उभा आहे.”

मी चक्रावलो. हा न्यूयॉर्क एअरपोर्ट आहे की भुलभुलैया?

टु कट द लाँग स्टोरी शॉर्ट ऍण्ड टु ऍण्ड द सस्पेन्स, आयोजकराव आणि मी ‘बी’ खाली जवळजवळ पाठीला पाठ लावून उभे होतो.

‘अहो, चार वेळा गेलो तुमच्यासमोरून पण तुम्हाला ओळखणार कसं?” ते थोडय़ा चढय़ा आवाजात म्हणाले, ”मी तुम्हाला स्पॅनिश समजलो. तुम्ही आयोजकांचा फोटो खिशात ठेवायला हवा.”

”मी सर्व आयोजकांचे फोटो खिशात बाळगण्यापेक्षा सर्व आयोजकांनी माझा फोटो जवळ ठेवणे जास्त सोपं नाही का?” मीदेखील चढय़ा आवाजात म्हणालो, ”त्यातून एअरपोर्टवर तुमच्यापैकी कोण येणार हे मला कसे कळावे? साधारणपणे आयोजक मला फोटोशिवाय ओळखतात.”

त्यावर त्यांनी पाकिटातून आपला फोटो काढून दाखवला. डोक्यावर केस होते. आता त्यांच्या माथ्यावर गवताचे पातेही नव्हते. फोटोवरून ते व त्यांच्यावरून फोटो ओळखू येत नव्हते. मीही त्यांना खिशातून माझा फोटो काढून दाखवला. मी स्पॅनिश माणसाचा फोटो खिशात का ठेवलाय त्यांना प्रश्न पडला असावा.

विनोद नाही. वस्तुस्थिती आहे. आता वस्तुस्थितीच विनोदी असेल तर भला मै क्या कर सकता हूँ?…