…आणि डॉ. काशीनाथ घाणेकर

रवींद्र नाट्यमंदिरात ‘यादों की बारात’ची पहिली प्रत कै. डॉ. काशिनाथ घाणेकर विकत घेत आहेत. त्या दिवशी मित्रमंडळींत वाटण्यासाठी म्हणून त्यांनी ६५ प्रती घेतल्या.
  • शिरीष कणेकर

डॉ. काशीनाथ घाणेकरांवर चरित्रपट काढण्याचं घाटतंय हे ऐकून मन आनंदनिर्भर झालं. त्याचबरोबर हे विस्तवाशी खेळणं आहे याचीही जाणीव झाली. कारणं काहीही असोत, आपण चरित्रपटांना न्याय देण्यात कमी पडतो असं आजवरचा इतिहास सांगतो. संभाव्य प्रतिक्रियांना घाबरून आपण चरित्र नायकाच्या स्वभावाचे कंगोरे गुळगुळीत करून घेतो, नकारात्मक, आक्षेपार्ह गोष्टींना बगल देतो (पहाः ‘डॅडी’) व एकूणच चित्रपट ‘गुडी गुडी’ होतो व चित्रपटाचा मूळ हेतूच मार खातो. आता संजय दत्तच्या जीवनावर चित्रपट निघतोय. रणबीर कपूर संजूबाबाचं काम करतोय. याही चित्रपटाकडून फारशा अपेक्षा नाहीत. चित्रपट वास्तवाच्या जास्त जवळ गेल्यास खुद्द संजय दत्त व त्याचे कुटुंबीय चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी नाकारतील, कोर्टात धाव घेतील. संजूबाबाला कोर्ट नवीन नाही.

यानिमित्तानं डॉ. काशीनाथ घाणेकरांची खूप आठवण आली. आठवणी या गतधवेच्या आसवांप्रमाणे असतात. एकदा आल्या की, येतच राहतात. थांबतच नाहीत. ‘वो जब याद आये बहोत याद आये.’

दिवस नाही रात्र नाही, थंडी नाही पाऊस नाही, केव्हाही डॉक्टरांचा फोन यायचा.

‘काय रे मादर xx, माजलास काय?’’ पलीकडून वेदवाणी यायची.

‘‘कोण डॉक्टर वाटतं?’’

‘‘शिव्यांवरून ओळखलंस वाटतं?’’

‘‘नाही, आवाजावरून.’’

‘‘साला, माझ्याशी चापलुसी करतोस? मी तुला ओळखून आहे.’’

‘‘माझं कौतुक करताय की शिव्या घालताय?’’

‘‘शिव्या घालून प्रेम व्यक्त करतोय. तू शब्दांच्या दुनियेतला माणूस. मी पडलो बापडा एक साधा नट.’’

‘‘साधा?’’ मी ओरडून विचारायचो.

साधारण संभाषणाची ही घाटणी असायची. गंमत म्हणजे आम्हा दोघांनाही एकमेकांशी बोलून बरं वाटायचं. मला नटश्रेष्ठ, सुपरस्टार डॉ. घाणेकरांशी बोलून बरं वाटणं स्वाभाविक होतं, पण त्यांना माझ्याशी बोलून काय आनंद मिळायचा तेच जाणोत.

‘‘मी तुझ्या लेखनाचा फॅन आहे.’’ एकदा ते आकस्मिकपणे म्हणाले.

‘‘मीही तुमच्या अभिनयाचा फॅन आहे.’’ जुगलबंदीला सुरुवात झाली होती.

‘‘तू माझा नाहीस, त्या कपाळावर केस ओढणाऱ्या झिपऱ्या दिलीपकुमारचा फॅन आहे. युसलेस साला?’’

‘‘कोण दिलीपकुमार की मी?’’

‘‘दोघंही!’’

डॉ. घाणेकर वयानं, कर्तृत्वानं, कीर्तीनं सगळ्यानंच माझ्यापेक्षा खूपच मोठे होते. मी त्यांच्याशी ज्या मित्रत्वाच्या, बरोबरीच्या नात्यानं बोलायचो त्यानं त्यांचे सहकलाकार स्तंभित झालेले पाहून मला आपल्या आगाऊपणाची क्वचित जाणीव व्हायची. तान्ह्या मुलाच्या लाथा आपण ज्या लडिवाळपणे सहन करतो तसे डॉक्टर मला सहन करीत असावेत. एरवी कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली!

प्रयोगाच्या आधी ते तिकिटाच्या बारीवर फोन करून विचारीत, ‘‘प्लॅन फुल झाला?’’

‘‘नाही डॉक्टर.’’ खिडकीतला माणूस म्हणे, ‘चारपाच तिकिटे अजून शिल्लक आहेत.’’

‘‘माझ्या नावावर घेऊन टाका आणि ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लावून टाका.’’ डॉक्टर आज्ञा करीत. ते थिएटरवर आले की ‘हाऊसफुल्ल’ दिसला पाहिजे. तसा तो दिसायचाच, पण डॉक्टरांना त्यासाठी थांबायला वेळ नव्हता. प्रयोग संपला की, मेकअप उतरवायला विंगेत तेल घेऊन माणूस उभा असायचा. खाली टॅक्सी तयार. थिएटरातून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या लोंढ्यासमोरच सिल्कचा झब्बा व पायजमा घातलेले डॉक्टर टॅक्सीकडे जात. पार्श्वभूमीवर ‘डॉक्टर डॉक्टर’ असा जल्लोश होई. प्रेक्षकांचे एवढे प्रेम दुसऱ्या कोणा कलाकाराला लाभलं असेल असं वाटत नाही. अशा वेळेला ते रंगभूमीवरचे अनभिषिक्त सम्राट दिसत.

एकदा शिवाजी मंदिरच्या गच्चीत माझ्याशी गप्पा मारताना खो खो हसताना ते मध्येच थांबले व म्हणाले, ‘‘थांब आलोच. बायाबापड्यांना रडवून येतो.’’

मी कुतूहलानं विंगेतून डोकावून पाहिलं. पायातल्या चपला काढून प्रसाद घेताना (नाटकः ‘अश्रूंची झाली फुले’) त्यांनी छाती भरून आल्याचा अप्रतिम अभिनय केला. प्रेक्षकांतील महिला खरोखरच मुसमुसायला लागल्या होत्या. ‘एक्झिट’ घेऊन डॉक्टर आले आणि त्यांनी गप्पा पुढे चालू केल्या.

‘‘डॉक्टर, तुम्ही खरोखरच नटसम्राट आहात,’’ मी भारावून म्हणालो.

‘‘मी नाही. ते डॉ. लागू.’’ डॉक्टर मिश्कीलपणे म्हणाले.

पोटात मदिरा, हातात मदिरा अशा अवस्थेत त्यांनी त्यांच्या घरात मला ‘एकच प्याला’मधलं स्वगत म्हणून दाखवलं होतं. या अभिनव अभिनयाविष्काराचा मी एकमेव प्रेक्षक होतो. त्या आठवणीनंही आज अंगावर काटा येतो.

हार्ट अटॅकमधून सावरत असलेल्या नेपथ्यकार श्याम आडारकरांच्या भेटीला मी डॉक्टरांसह त्यांचं शेपूट म्हणून गेलो.

‘‘मी एक ग्लास म्हशीचं दूध रोज पितो.’’ डॉक्टरांनी आडारकरांना कोणी न विचारता माहिती पुरवली. ‘‘तू असं कर काश्या’’ आडारकर पडल्या पडल्या म्हणाले, ‘‘आधी तू म्हशीला व्हिस्की पाज आणि मग तिचं दूध पी.’’

निघण्यापूर्वी आडारकरांच्या मुलाला भरीस घालून डॉक्टरांनी त्याला फडताळातली दारूची बाटली काढायला लावलीच.

‘‘आता उद्या सकाळी म्हशीचं दूध ना?’’

‘‘तू मला टोमणे मारतोयस?’’

‘‘नाही हो डॉक्टर. मी काय तुम्हाला टोमणे मारतोय? माझी हैसियत काय?’’

माझ्या ‘यादों की बारात’ पुस्तकाच्या प्रकाशनाला डॉक्टरांनी आवर्जून पहिली प्रत विकत घेतली व नंतर पासष्ट प्रती खरिदल्या.

‘‘डॉक्टर, एवढ्या प्रती कुठे गुत्त्यावर वाटणार का?’’ मी खोचकपणे विचारले.

रवींद्रच्या ‘टॉयलेट’पर्यंत डॉक्टर माझ्या मागे धावले होते. प्रेक्षक हा सोहळा अचंबित होऊन बघत होते. या निर्मळ मनाच्या प्रेमळ माणसाचा मी फार गैरफायदा घेतला. डॉक्टरांच्यात एक खोडकर मूल दडलेलं होतं. ‘गुंतता हृदय हे’मधील एक गाजलेला प्रसंग.

डॉक्टर- ‘‘इतक्या वेळा बोलावूनही आलो नाही याचा अर्थ नाही कळला?’’

आशा काळे- अर्थ कळूनही बोलावत राहिले याचा अर्थ नाही कळला?

प्रेक्षकांतून उत्स्फूर्त दाद येते. एका प्रयोगात डॉक्टर अडून बसले. ‘‘माझ्या आधीच्या वाक्यामुळे तिच्या उद्गारांना दाद येते. आज मी ते वाक्य घेणारच नाही. पाहू ती कशी दाद मिळवते?’’

दादापुता करून मुश्किलीनं डॉक्टरांना मनवावं लागलं.

नाटय़रसिकांनी दुसऱ्या कोणत्याही कलाकारावर एवढं भरभरून प्रेम केलं नसेल. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ असे श्रेयनामावलीत नाटय़गृहाच्या जाहिरात फलकावर झळकलं की, ‘हाऊसफुल्ल’ची पाटी लागलीच पाहिजे.

एका रात्री डॉक्टरांनी विश्राम बेडेकरांना फोन करून उठवलं व ते निर्वाणीचं बोलले, ‘‘मी आत्ता हा फोन ठेवल्यावर बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या करणार आहे.’’

‘‘ठीक आहे.’’ बेडेकर म्हणाले, ‘‘सकाळी बोलू.’’

प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असा लोकोत्तर नट, दिलदार मित्र, खोडकर, निरागस मूल, तऱ्हेवाईक, आत्मकेंद्रित मदिरासक्त हे सगळे डॉ. काशीनाथ घाणेकरांचे पैलू या आगामी चित्रपटात पाहायला मिळतील का?

माझ्या कानावर आलं की, डॉ. काशीनाथ घाणेकरांवर निघत असलेल्या चित्रपटात डॉक्टरांची प्रमुख भूमिका सुबोध भावे करीत आहे. अरे! ‘लोकमान्य टिळक’ सुबोध भावे, ‘नारायणराव बालगंधर्व’ सुबोध भावे आणि ‘डॉ. घाणेकर’ही सुबोध भावेच? मी त्याला आणखी काही भूमिका सुचवू इच्छितो- सेरेना विल्यम्स, डॉ. अब्दुल कलाम व अफझलखान! मराठी व्याकरणात ‘भावे प्रयोग’ म्हणून ओळखला जातो तो हाच असेल का?….

[email protected]

 

एक प्रतिक्रिया