नळीबाबा ऊर्फ मटण्या मिलिंद

148
  • शिरीष कणेकर

श्री.रामचंद्र अधिकारी व सौ. जयश्री अधिकारी यांच्या पोटी मिलिंद नावाचा तेजःपुंज व घराण्याचा झेंडा अटकेपार नेणारा पुत्र जन्माला आला. त्या क्षणी मुंबईतील समस्त देवळातील घंटा आपोआप वाजू लागल्या व बोकड थरथर कापत बें बें करू लागले. त्यांच्या सौभाग्यवती काळजीनं व्याकूळ झाल्या. देवाच्या दहा अवतारांनंतर जन्मलेला हा अकरावा अवतार होता. जन्मतःच त्याच्या हातात बोकडाची नळी होती. हा चमत्कार बघायला अलोट गर्दी लोटली. त्याच्या चिमुकल्या हातातून ती बोकडाची नळी काढून घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचाच हात खांद्यापासून उखडला गेला. अशा रितीनं मिलिंददेवाच्या कोपाची प्रचीती तो जन्मल्या जन्मल्या आली. जन्मल्याबरोबर सूर्यबिंब ग्रासायला उड्डाण करणाऱ्या हनुमानाचं आजही आपल्याला कौतुक आहे, मग जन्मल्याबरोबर हातातली बोकडाची नळी नाचवणाऱ्या मिलिंदचं तेवढंच कौतुक का नसावं? हे मूल मोठेपणी आसाराम बापू किंवा राम रहीम समान दैवी पुरुष म्हणून ओळखलं जाईल, अशी सगळी लक्षणे होती.

प्रसूतिगृहात अर्धोन्मिलीत इवल्याशा डोळय़ांनी तो स्टाफवरच्या नर्सेसमध्ये आपली हनीप्रीत शोधत होता. देशात एकाएकी बाबा-बुवांचं दुर्भिक्ष पडलंय. त्यामुळे मिलिंद पुढेमागे ‘नळीबाबा’ म्हणून ओळखला जाईल असे भाकीत साध्वी राधेमाँ यांनी वर्तवले होते.

मिलिंद मटण खातो असं म्हणणं म्हणजे सूर्य तेजस्वी आहे असं म्हणण्यासारखं आहे. सूर्य तेजस्वी आहे असं मुद्दाम सांगायला तो काय कोणाला मेणबत्ती वाटला होता की चाळीस पॉवरचा बल्ब? सिंह कधी आयुष्यात साबुदाण्याची खिचडी, अळूचं फदफदं, शिंगाड्याच्या पिठाचं थालीपीठ खात असतो का? पुढला-मागला भात खाऊन सिंह ढेकर देतो का? ‘काय, गुहेत बारीक रवा नाही?’ असं तो गुरगुरत सिंहिणीला विचारतो का? मग मिलिंददेखील मटण नाही खाणार तर काय गव्हाची लापशी खाणार? लग्नानंतर तो राहण्यासाठी आटोपशीर गुहा शोधत होता. ती मुलुंडमध्ये कुठंच मिळाली नाही. काही काळ राणीच्या बागेत काढावा असंही त्याला वाटून गेलं. (गुहा म्हटल्यावर दोघं वळून पाहतात – अनिता व सिंह’ इति संजय मोने.) शेवटी नाईलाजानं सोसायटीत जागा घेऊन तो चारचौघांसारखा माणसात राहू लागला. पण आजही तो मध्येच सिंहासारखा गुरगुरतो व आयाळ झटकल्यासारखं करतो. सिंहाच्यात शिकार करणे वगैरे सगळं काही सिंहिणी करतात. मिलिंदच्या घरातही सगळं काही त्याची बायको सुषमा करते. मटण खाण्यासाठी त्याला एनर्जी राखून ठेवावी लागते. हेही सिंहासारखंच. नशीब तो अजून अल्सेशियन कुत्र्यासारखं कच्च मटण अल्युमिनियमच्या थाळीत घेऊन गळ्यातील साखळीला हिसका देत खायला लागलेला नाही. याच कारणासाठी त्यानं अजून घरात अल्सेशियन कुत्रा पाळलेला नाही. घरात मटणावरून स्पर्धा, भांडणं, मारामाऱ्या नकोत. भुंकणाऱ्याच्या अंगावर आपण काय भुंकायचं- आय मीन ओरडायचं?

मटण म्हणजे रस्सा असलेलं रगमगीत मटण. मटणाचे इतर प्रकार त्याला वर्ज्य नाहीत. म्हणजे मटण बिर्याणी दिलीत तर तो खाणार नाही असं नाही. खिमा पॅटीसही खाईल. रोगन जोशही खाईल. पण ‘गिव्हन अ चॉइस’ त्याला प्युअर व सिंपल मटण रस्सा हवा. त्याच्या बायकोनं म्हणजे लग्नात असा उखाणा घेतला होता –

मामंजींच्या शर्टाचं तुटलं बटण
मिलिंदराव खातात बोकडाचं मटण
मग मिलिंदनं उखाणा घेतला असेल –
लहान मुलाच्या तोंडाला लावतात चाटण
सुषमाचं नाव घेतो खाता खाता मटण

एकदा ‘ताज’ला एका कार्यक्रमाला मी मिलिंदसह गेलो होतो. तिथं जेवण होतं. (एरवी तो कशाला आला असता?) मी मेनूवरून नजर फिरवली. त्यात मटण नव्हतं. व्हॉट? त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी मिलिंदची त्रिवार क्षमा मागितली. तसा तो मोठ्या मनाचा होता. मटणाचा अनपेक्षित विरह पचवून तो लोकोत्तर तन्मयतेनं चिकनला सद्गती देण्यासाठी तुटून पडला. माझं एवढंच म्हणणं होतं की, मटण नसल्याचा राग त्यानं चिकनवर काढू नये. बघता बघता त्याच्या प्लेटमध्ये चिकनच्या हाडांचा पर्वतीएवढा ढिगारा झाला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलही तिथं उपस्थित होते. कार्यक्रम (व चिकन) संपवून मी आणि मिलिंद बाहेर पडलो.

‘‘पाहिलंस ना?’’ मिलिंदनं चिडून विचारलं, ‘‘ते वसंतदादा किती चिकन खात होते?’’

‘‘अरे पण, तूही पोटभर खाल्लंस ना?’’ मी हतबुद्ध होऊन म्हणालो.

मग माझ्या लक्षात आलं की मिलिंदनं किती खाल्लं हा प्रश्नच नव्हता. तो खाणारच. पण तो तिथं असताना आणखी कोणी (मग ते मुख्यमंत्री का असेनात) इतकं चिकन हादडावं हे त्याला मान्यच नव्हतं.

‘‘काय वाटलं असेल चिकनला?’’ मिलिंद चरफडला, ‘‘माझं सोड, त्या चिकनच्या भावनेचा तरी थोडा विचार करायचा. नशीब मटण नव्हतं.’’

ज्या दिवशी मी त्याच्यातलं थोडं मटण खाईन त्या दिवशी पुढचा मागचा विचार न करता तो माझं मटण करायला कमी करणार नाही. केवळ मटण खाण्यासाठी कोणाचा जन्म असू शकतो यावर विश्वास ठेवणं अजूनही मला कठीण जातं. त्याच्या नामोच्चारानं बोकडांना हुडहुडी भरलेली पाहिली की त्याचं मटणमय जीवन स्वीकारावंच लागतं. एखाद्या सोन्यासारख्या रविवारी त्याला फरसबी, भेंडी, वालपापडी नाहीतर पडवळ द्यायची व तिथून जीव मुठीत धरून धूम पळत सुटायचं हे माझं एक धाडसी स्वप्न आहे. जिवंत बोकडदेखील त्याला पाहून वाट फुटेल तिकडे पळत सुटतात तर माझं काय? ‘तुझा शेवट गोड (खरं म्हणजे तिखट) होईल’ असं बोकडाचं भविष्य असेल तर आपण मिलिंदच्या ताटात पडणार हे तो ओळखतो.

तशी मिलिंदला कुंडली पाहून भविष्य ताडण्यात गती आहे. त्याला हिंदू धर्मापासून योगापर्यंत अनेक गोष्टीत गती आहे. (मटणातली गती सगळेच जाणतात.) ज्योतिषी गाठून त्यांना हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची त्याला हॉबी आहे. एक पहुंचा हुवा ज्योतिषी त्याला म्हणाला, ‘‘मिलिंदराव, तुमचा शुक्र सॉलीड स्ट्राँग आहे.’’

भरवशाच्या खाटकानं शिळं, जून मटण दिल्यागत मिलिंद उखडला. ‘‘काय चाटायचाय तो स्ट्राँग शुक्र?’’ तो खेकसून म्हणाला, ‘‘एक बाई हिंग लावून विचारत नाही की वाऱ्याला उभी राहत नाही. म्हणे स्ट्राँग शुक्र!’

पोथीपुराण, व्रतवैकल्य, जप-तप, उपास-तापास यात एरवी तो आकंठ बुडालाय. या सर्व धर्मकांडांची व मटणाची तो कशी सांगड घालतो कोण जाणे. मी त्याला विचारलं तेव्हा चेहऱ्यावर पावडरसारखं ज्ञान थापून तो म्हणाला, ‘‘हेच लोकांना कळत नाही. मटण-मच्छी खाऊ नका असं धर्मात कुठंही सांगितलेलं नाही. शाकाहारी लोकांनी उठवलेलं हे थोतांड आहे. मटण खाणं म्हणजे पाप असं पसरवलं गेलंय.’’

मात्र नवरात्रीचे दहा दिवस तो मांसमटण खात नाही. (या काळात बोकड त्याच्या खांद्यावर मान टाकून झोपला तरी बोकडाच्या जिवाला काही धोका नाही.) तो परान्नही घेत नाही. त्यानं माझ्याकडे चहाही घेतला नाही. नवरात्र संपल्यावर तो किती त्वेशानं अज (पक्षी : बोकड) संहार करीत असेल आपण कल्पनाच करू शकतो.

मिलिंदच्या मासेखाऊ पणजोबांनी निवट्यांचा निर्वंश केला अशी सत्यावर आधारलेली एक दंतकथा प्रचलित आहे. निवटे खाण्याचं त्यांचं एक टेक्निक होतं. निवटा शेपटापाशी धरायचा व तोंडात टाकून पटकन् अख्खा गिळायचा. ते निवटे खायला (म्हणजे गिळायला) बसायचे तेव्हा ते मनोहर दृश्य पाहून त्यापासून काही शिकण्यासाठी गल्लीतली मांजरं समोर बसून त्यांचं निरीक्षण करीत. परशुरामानं एकवीस वेळा क्षत्रियांचा संहार केला. तरी क्षत्रिय उरलेच. त्याचप्रमाणे पणजोबांनी निवट्यांचा निर्वंश करूनही अलीकडे मच्छीबाजारात अधूनमधून मला तुरळक निवटे दिसायला लागलेत. मिलिंदची बोकडभक्ती पाहून त्याच्या पणजोबांच्या आत्म्याला चिरशांती मिळाली असेल.

मिलिंदला मी एक पुस्तक अर्पण केलंय. अर्पणपत्रिकेत मी लिहिलंय – ‘मटणाखालोखाल त्याचा माझ्यावर जीव आहे असं वाटून घ्यायला मला आवडतं.’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या