सॅटिसवर पाण्याची सोयच नाही, भरउन्हात टीएमटीचे कर्मचारी तहानलेले

सामना प्रतिनिधी । ठाणे

पाणीटंचाईचा सामना केवळ ग्रामीण भागातील रहिवाशांनाच नव्हे तर शहरी भागातही करावा लागत आहे. सॅटिस पुलावर पिण्याच्या पाण्याची सोयच नसल्याने भरउन्हात टीएमटीचे कर्मचारी तहानलेले आहेत. वागळे डेपोमधील पाणी रोज बसमधून बाटल्या भरून आणावे लागत असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे टीएमटीच्या कर्मचाऱ्यांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. ठाणे महापालिका एकीकडे कोटय़वधी रुपयांच्या योजना आखत असतानाच सॅटिसवरील कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सॅटिसवरून टीएमटीच्या बसेस सुटतात. ठाणे शहरातील वागळे, लोकमान्यनगर, कापूरबावडी, बाळकुम, वृंदावन, ढोकाळी, उपवन, शिवाईनगर, घोडबंदर रोड, ओवळा आदी विविध ठिकाणी या बसेस जात असून सॅटिसवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. टीएमटीचे चालक व वाहक यांच्यासाठी सॅटिसवर अत्यंत निकृष्ट दर्जाची टपरी असून उन्हाचे चटके सहन करत त्यांना काम करावे लागते. सध्या मोठय़ा प्रमाणावर उन्हाच्या झळा लागत असून सॅटिसवर बस घेऊन आलेल्या वाहक व चालकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. अनेक कर्मचारी स्वतःसोबत पाण्याच्या बाटल्या ठेवतात. मात्र पालिकेने या कर्मचाऱ्यांसाठी पाण्याची कोणतीही सोय केली नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना सॅटिसजवळील हॉटेलमध्ये जाऊन पाणी प्यावे लागते.

कुलर गेला कुठे?

टीएमटीचे कर्मचारी तसेच प्रवाशांना थंडगार पाणी प्यायला मिळावे म्हणून प्रशासनाने सॅटिसवर कुलरची व्यवस्था केली होती. पाण्याचे स्वतंत्र कनेक्शनदेखील होते. मात्र गेल्या दीड वर्षापासून हा कुलर गायब झाला आहे. पाण्याचे नवे कनेक्शन घेऊन कुलरची दुरुस्ती करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. तेही हवेत विरले आहे. रोज वागळे डेपोतून पाण्याच्या मोठय़ा बाटल्या बसमधून कर्मचाऱ्यांनाच स्वतः आणाव्या लागतात.