नारेगाव आंदोलकांशी पुन्हा चर्चा करणार

1

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे रविवारी नारेगाव येथे जाऊन पुन्हा ग्रामस्थांशी चर्चा करून कचराकोंडी फोडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शहरातील नागरिकांना कचराकोंडीपासून दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्यामुळे शहरात कचरा कोंडी निर्माण झाली आहे. ही कचराकोंडी सोडविण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले सर्व दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. प्रभागातील कचरा प्रभागात जिरविण्याचा प्रयत्न आज केल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु हा पर्याय अंतिम ठरू शकत नाही. त्यामुळे चिकलठाणा येथे महानगरपालिकेला दुग्धनगरीसाठी गट नंबर २३१ मधील २४ एकर जागा मिळाली आहे. या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी वाहने गेली असता ग्रामस्थांनी विरोध केला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवली, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर नारेगाव येथील आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी मनपाचे पदाधिकारी गेले. मात्र ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करता आली नाही. नारेगाव कचरा डेपोचे आंदोलन करणाऱ्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दोन महिन्याची मुदत द्यावी याकरिता उद्या रविवारी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल. कचरा डेपोच्या ठिकाणी आतापर्यंत २० लाख मे.टन कचरा जमा झालेला आहे. हा कचरा नष्ट करण्याच्या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले जात असून सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून ग्रामस्थांना विनंती केली जाईल. रविवारी सुटी असल्यामुळे कचरा उचलला जात नसला तरी अशा आणीबाणीच्या परिस्थितीत रविवारी कचरा उचलण्यात येईल. तसेच कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता नगरसेवकांची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.