चिमुरड्याने आईचा आयफोन ४७ वर्षांसाठी लॉक केला

सामना ऑनलाईन। बीजिंग

चुकीचा पासवर्ड टाकल्याने मोबाईल अनेकवेळा लॉक होतो. थोड्या वेळाने तो अनलॉकही करता येतो. पण चीनमधील शांघाय येथे एका २ वर्षांच्या करामती चिमुरड्याने आईचा आयफोन चक्क ४७ वर्षांसाठी लॉक केला आहे. चुकीचा पासवर्ड अनेकवेळा टाकल्याने आयफोन २३ मिलियन मिनिटं म्हणजेच ४७ वर्षांसाठी लॉक झाला आहे. लू नावाच्या महिलेचा हा आयफोन आहे.

Kankanews.com ने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी लू बाहेर कामासाठी गेली होती. जाताना तिने मुलाला मोबाईल गेम खेळण्यासाठी दिला होता. पण घरी परतल्यावर मोबाईल लॉक झाल्याचं तिच्या लक्षात आलं .तिने खूप प्रयत्नही केला पण मोबाईल काही अनलॉक होत नव्हता. यामुळे ती मोबाईल गॅलरीत गेली. टेक्निशियनने मोबाईल तपासला असता चुकीचा पासवर्ड अनेकदा टाकल्याने तो ४७ वर्षांसाठी लॉक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. तसेच मोबाईल अनलॉक करण्यासाठी तो फॉरमॅट करणे किंवा ४७ वर्ष वाट पाहणे हेच दोन पर्याय असल्याचे त्याने लू ला सांगितले. हे ऐकूण लू ला आश्चर्चयाचा धक्का बसला. मोबाईल फॉरमॅट केल्यास त्यातील डेटा जाणार. अन्यथा ४७ वर्ष मोबाईल अनलॉक होण्याची तिला वाट पाहावी लागणार आहे.

पण आयफोन इतक्या दिर्घकाळासाठी अनलॉक होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधीही चुकीचा पासवर्ड टाकल्याने ८० वर्षासाठी आयफोन अनलॉक झाल्याचा प्रकार घडलेला आहे. iOS डिवाईसवर ६ वेळा चुकीचा पासवर्ड टाकल्यानंतर ते अनलॉक होतातच. यामुळे तुम्ही जर आयफोन वापरत असाल तर त्याचा पासवर्ड विसरण्याची किंवा तो सतत बदलण्याची चूक करु नका.