टोमॅटो ताटातून नाही तर बाजारातूनही गायब! खराब टोमॅटो सुद्धा खातोय भाव, आवक कमी व मागणी जास्त

कधी काळी टोमॅटोचे आगार समजल्या जाणाऱ्या कोल्हार भगवतीपूर मध्ये आता टोमॅटो लागवडीची संख्या पुर्णपणे घटत आहे. यास जमिनीचा घसरलेला पोत, अवेळी पडणारा पाऊस. त्यामुळे एक ते दीड महिन्यांपूर्वी रस्त्यावर फेकलेल्या टोमॅटोने आता चांगलाच भाव खाल्ला आहे. गत महिन्यांपासून बाजार कडाडला आणि लिंबू,मिरची व टोमॅटोने शंभरी पार केली. आता सर्वसामान्यांच्या ताटातून नव्हे तर बाजारातूनही टोमॅटो दिसेनासा झाला आहे.

जुलैचा पंधरवडा उलटला मात्र एखादं दोन पाऊस वगळता परिसरात पावसाने शेतकऱ्यांचा अंत पहिला आहे. पाऊस नसल्याने बळीराजा हवालदिल झाला. मात्र पाऊस वरुणराजा काही बरसत नाहीये. दीड दोन महिन्यांपूर्वी मागणी कमी अन उत्पन्न जास्त असल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्याचे चित्र होते. रस्त्याच्या कडेला अक्षरशः टोमॅटो पडून सडला त्यास फक्त पिकास हमी भाव मिळत नसल्याचे दिसते.

बाजारात सध्या अगदी फेकून देण्यासारखं टोमॅटो 100 रूपांनी विकला जातोय. तर आता चक्क हिरवा मात्र चांगल्या प्रतीचा टोमॅटो बाजारात विक्रीसाठी दिसत आहे. कुठल्याही आठवडे बाजारात टोमॅटो दिसला तर तेथे फक्त भाव विचारणाऱ्या महिला दिसतात. भाव ऐकताच डोक्याला आठ्या पाडत महिला पुढे सरकतात. मात्र गरजवंत खरेदी करताना दिसतात.

कुल्याही हंगामात एक पिकाला चांगला भाव मिळाला की इतर शेतकरी त्याच अनुकरण करतात. मात्र कुठल्या हंगामात कोणत्या पिकांची लागवड करावी हे शास्त्र सुद्धा आता शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचे आहे. टोमॅटो पिकांमध्ये काही मोजकेच शेतकरी अक्षरशः करोडपती झाले. तर काहींच्या टोमॅटो रस्त्यावर पडून सडला. यास निसर्गाचा लहरीपणा कारणीभूत असला तरी शेतकऱ्यांनी पीक लागवड करतांना याचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

दर वाढीचा फायदा नेमका कुणाला!

रब्बी आणि उन्हाळी हंगामात 15 हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड झाली. त्यास केवळ 10 ते 12 रुपये भाव मिळाला. आता टोमॅटो 100 ते 160 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या दरवाढीचा फायदा शेतकरी राजास मिळणे अपेक्षित आहे. मात्र फायदा नेमका कुणाला मिळतो हे वास्तव सुद्धा समोर येणं गरजेचं आहे.

अवेळी येणारा पाऊस व पिकावरील व्हायरल हल्ला

उत्पन्न व मालाच्या उपलबद्धतेवर सर्व अवलंबून असते. जास्त उत्पन्न झाल्यास भाव कमी मिळतो. सर्व व्यापाऱ्यांच्या हाती नसते. मागणी कमी आणि पुरवठा जास्त असल्यास पिकांना भाव मिळत नाही. त्यात शेतकरी एखाद्या पिकाला जास्त भाव मिळाला की सर्वच ते पीक घेतात त्यामुळे भाव पडतात. परिसरात जमिनीचा पोत घसरत असून टोमॅटो पिकावर व्हायरल ऍटेक होत असल्याने सदर पीक पूर्ण खराब होते. त्यात टोमॅटो पिकास अनुकूल वातावरण राहिले नाही. अवेळी होणाऱ्या पावसाने हवं तेवढं उत्पन्न मिळत नाही त्यामुळे टोमॅटोच्या या आगारात लागवड कमी झाली आहे. यासाठी पिकांना हमीभाव मिळणे गरजेचे आहे.

– अॅड. सुरेंद्र खर्डे , शेतकरी व माजी सरपंच