लैंगिक छळाचा आरोप असलेल्या बड्या अधिकाऱ्याची आत्महत्या

सामना ऑनलाईन । ठाणे

ठाण्यात एका खासगी कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इमारतीच्या 25 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अभिशेष शर्मा असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने सोमवारी रात्री ठाण्यातील कोलशेत परिसरातील राहत असलेल्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अभिशेषला एका महिला सहकाऱ्याला अश्लील आणि धमकीचे मेसेज पाठवून लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक झाली होती. सोमवारी त्याची जामिनावर सुटका झाली होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अभिशेषने तक्रारदार महिलेला आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

घणसोली येथील एका नामांकित कंपनीत अभिशेष व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने दुसऱ्या कंपनीत नोकरी धरल्यानंतर कासारवडवली पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीत तिने आरोप केला होता की अभिशेष तिला अश्लील मेसेज आणि ईमेल पाठवतो. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-1 ने या प्रकरणी तपास करून 29 नोव्हेंबर रोजी अभिषेश शर्माला अटक केली होती. सोमवारी अभिषेशला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. जामीन मिळाल्यानंतर अभिषेश घरी गेला. त्याच रात्री 9.30 च्या सुमारास, इमारतीच्या 25 व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यावरील हस्ताक्षर हे अभिषेशचेच आहे का?  याची पोलीस पडताळणी करत आहेत.