तोरणमाळचे आकर्षण वाढले, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातून पर्यटक दाखल

सामना ऑनलाईन । धुळे

विपुल नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेल्या सातपुडा डोंगररांगामधील तोरणमाळ सध्या गर्दीने फुलून गेला आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकावर असलेले हे थंड हवेचे ठिकाण आहे. पर्यटन हंगामाची सुरुवात झाली असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातमधील पर्यटक सध्या येथे दाखल होऊ लागले आहेत. प्राचीन यशवंत तलावातील नौका विहार, गोरक्षनाथ, मच्छींद्रनाथ तपोभूमी, सीताखाई आणि आदिवासी बांधवांचे पारंपरिक खाद्य येथील मुख्य आकर्षण आहे.

नंदुरबार जिह्यातील अक्राणी तालुक्यात वसलेला तोरणमाळ महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणात तोरणमाळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. समुद्र सपाटीपासून तोरणमाळची उंची एक हजार ७६ मीटर आहे. सातपुडय़ाच्या कुशित वसलेले तोरणमाळ परिसरात दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ वाढत आहे. सध्या परिसरात गुलाबी थंडी पसरली असून सर्वदूर हिरवळ दाटली आहे. सप्तपुडातून खळखळणारे पाणी जंगलात निरनिराळय़ा पानाफुलांचा पसरलेला गंध तसेच प्राचीन यशवंत तलावात नौका विहाराची सोय यामुळे सीमा रेषेलगत असलेल्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील अनेक पर्यटक येथे दाखल होऊ लागले आहेत.

सर्वसाधारणपणे दोन हजार लोकसंख्या असलेल्या या क्षेत्रात नैसर्गिक सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण असून येथील प्राचीन यशवंत तलाव उत्तरेकडे असलेली सीताखाई आणि रस्त्यावरील कमळ तलाव अनेक पर्यटकांना खुणावतो. तोरणमाळ पर्यटनाच्या नकाशावर यावे आणि अधिकाधिक पर्यटक यावेत यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. यशवंत तलावाच्या काठावरच वनविभागाने पर्यटकांसाठी निवासस्थानांची व्यवस्था केलेली असल्याने सध्या पर्यटकांचा राबता वाढू लागला आहे.