अनुसूचित जमाती कल्याण समिती तीन दिवस बुलढाणा जिल्हा दौर्‍यावर; प्रशासन लागले कामाला

राजेश देशमाने । बुलढाणा

अनुसूचित जमाती कल्याण समिती दि. २७ ते २९ सप्टेंबर असे तीन दिवस बुलढाणा जिल्हा दौर्‍यावर येत आहे. त्यामुळे या दौर्‍याच्या अनुषंगाने प्रशासन सतर्क झाले असून बैठकीवर बैठकीचे सत्र सुरु झाले आहे.

अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणार्‍या कल्याणकारी योजना व अंमलबजावणी तसेच अधिकारी, कर्मचारी भरती बढती आरक्षण व अनुशेष जात पडताळणी विषयक बाबींची समिती तपासणी करणार आहे. त्या अनुषंगाने दि. २७ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता समितीचे आगमण असून ९.३० वाजता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हापरिषद अध्यक्ष, सभापती यांच्यासमवेत बैठक होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत संबंधित अधिकार्‍यांसोबत चर्चा करणार, दुपारी १२ वाजता पोलीस अधिक्षकांसोबत चर्चा, दुपारी १२.३० वाजता राज्य विद्युत वितरण कंपनी व महाराष्ट्र विद्युत महापारेषण कंपनी बुलढाणा अधिकार्‍यांसोबत चर्चा, दुपारी १ वाजता राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांसोबत चर्चा, दुपारी १.३० वाजता राज्य परिवहन महामंडळ अधिकार्‍यांसोबत चर्चा, दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद अधिकार्‍यांसोबत चर्चा, सायंकाळी ५ वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सायंकाळी ६ वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिकार्‍यांसोबत चर्चा, सायंकाळी ६.३० वाजता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला अधिकार्‍यांसोबत चर्चा, तर २८ सप्टेंबर शुक्रवारला सकाळी ९ वाजता अकोला प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या तालुकानिहाय आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा वसतीगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणाकडून करण्यात आलेल्या कामांना समिती भेट देऊन पाहणी व संबंधित अधिकार्‍यांसोबत चर्चा करणार आहे तर २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक असून समितीने जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा वसतीगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणाकडून करण्यात आलेल्या कामांना दिलेल्या भेटीच्या अनुषंगाने आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात करावयाची कार्यवाही तसेच अधिकारी कर्मचारी यांच्या भरती बढती आरक्षण व अनुशेष याबाबत बैठकीच्या वेळी उपस्थितीत झालेल्या मुद्यांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही या संदर्भात जिल्ह्यातील संबंधित अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक होणार आहे. सदर समिती तीन दिवस दौर्‍यावर असल्यामुळे संपूर्ण प्रशासन कामाला लागले असून बैठकीवर बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.

समिती प्रमुख व सदस्य
अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख आमदार डॉ. अशोक उईके, सदस्य आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार पास्कलधनारे, आमदार संजय पुराम, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार राजभाऊ वाजे, आमदार शांताराम मोरे, आमदार अमित घोडा, आमदार डॉ. संतोष टारफे, आमदार वैभव पिचड, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार गोपीकिसन बाजोरिया, आमदार आनंद ठाकूर, आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार श्रीकांत देशपांडे यांचा समितीत समावेश आहे.