मालवणात पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण, गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवणात पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण झाल्याच्या दोन घटना बुधवारी घडल्या. तारकर्ली व किल्ले सिंधुदुर्ग या ठिकाणी झालेल्या या मारहाणीबाबत रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंद करण्याची कार्यवाही पोलीस ठाण्यात सुरू होती.

तारकर्ली रांजेश्वर मंदिर समोरील पार्किंग परिसरातील बाथरूममध्ये एक पर्यटक महिला गेली असताना एका स्थानिक महिलेने बाथरूमचा दरवाजा उघडल्याच्या रागातून त्या पर्यटक महिलेच्या पतीने त्या स्थानिक महिलेला मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. ही मारहाण सोडवण्यास गेलेल्या स्थानिक हॉटेल व्यावसायिक महिला व इतर पर्यटकांना देखील त्या पर्यटकाने मारहाण करत एका दुकानातील बरण्या फोडून नुकसान केले. हे प्रकरण सायंकाळी उशिरा मालवण पोलीस स्थानकात पोहचल्यानंतर याबाबतची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पर्यटन कर वसूली कर्मचाऱ्यास मारहाण
पर्यटन कर मगितल्याच्या कारणावरून सिंधुदुर्ग किल्ल्यात वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीमार्फत पर्यटन कर वसूल करणाऱ्या हेमंत वराडकर या कर्मचाऱ्याला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ही मारहाण सोडवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याचे सहकारी मानसी संतोष सावंत व गजानन रोगे यांनाही पर्यटकांनी धक्काबुक्की केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत मालवण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवणे व गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू होती.