प्री वेडिंगच्या शूटिंगवरून धिंगाणा, पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला

सामना प्रतिनिधी । मुंबई

श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर ड्रोनच्या सहाय्याने प्री वेडिंगचे शूटिंग सुरू असताना चौकशी केल्याचा राग आल्याने पर्यटकांनी पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांच्यासह पोलिसांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. खेडेकर यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याने त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. प्री वेडिंगच्या नावाखाली दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या 11 जणांना अटक केली आहे, तर दोघेजण फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. हल्लेखोर हे एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे बोलले जाते. या घटनेमुळे पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

श्रीवर्धन समुद्रकिनारा हा पर्यटकांचे आकर्षण असल्याने अनेक जण येथे येतात. सध्या तरुणांमध्ये प्री वेडिंग शूटिंगची मोठी क्रेझ आहे. पुणे, संभाजीनगर येथून दोन कुटुंबे प्री वेडिंग शूटिंगसाठी श्रीवर्धन समुद्रकिनारी आले होते. विशेष म्हणजे या शूटिंगसाठी ड्रोनचा वापर केला जात होता. सायंकाळी 6.30 च्या सुमारास श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर हे समुद्रकिनाऱ्यावर आले असताना ड्रोन भिरभिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्री वेडिंगसाठी आलेले काही पर्यटक दारू पिऊन धिंगाणा करत होते.

सुरेश खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्री वेडिंगचे शूटिंग करणाऱ्यांना तुम्ही कुठून आला आहात? ड्रोन कॅमेरा वापरण्याची परवानगी घेतली आहे काय? असे प्रश्न विचारले. त्यामुळे संतप्त पर्यटकांनी थेट खेडेकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. ड्रोनचा वापर करण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असताना पुणे व संभाजीनगरहून आलेल्या पर्यटकांनी मनमानी करत शूटिंग केले. एवढेच नव्हे तर खाकी वर्दीवरच हल्ला केल्याने संताप व्यक्त होत आहे.

यांना अटक
या हल्ल्याप्रकरणी अतुल सुराणा, सत्यम सुराणा, शुभम सुराणा, वर्षा सुराणा, अंतुल गोलेचा, विष्णू गव्हाणे, नागेश पोतदार, मयूर पोतदार, हर्षल मसजी (पुणे), प्रचीती सखलेचा, संगीत सखलेचा (संभाजीनगर) यांना अटक केली आहे.

राजकीय नेत्याचा दबाव
श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर 11 जणांना अटक केली. मात्र त्यांना सोडवण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी दबाव टाकला. अनेक व्हीआयपींचे फोन अधिकाऱ्यांना गेल्याचे सांगण्यात येते.