सिंधुदुर्गात पर्यटन कर आकारणीस प्रारंभ

 

पर्यटकांचेही सहकार्य
मालवण, दि. २८ (सा.वा.) – महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण मंत्रालयाच्या परवानगीनंतर पर्यटकांकडून कर आकारणी करण्याचा प्रारंभ देवबाग ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. शासनाकडून जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायत क्षेत्रात पर्यटन कर आकारणीस महिन्याभरापूर्वी परवानगी देण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांकडून कर आकारणी केली जात आहे. आजपासून देवबाग ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कर आकारणीस सुरवात झाली. पर्यटकांनीही कर वसुलीस सहकार्य केले.
तारकर्ली-देवबाग मार्गावर कर्लीनदी किनार्‍यावर देवबाग गावाच्या हद्दीवर कर आकारणीस सुरवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी चार हजारांहून अधिकचा कर वसूल झाल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. आज देवबाग सरपंच उल्हास तांडेल, ग्रामसेवक युवराज चव्हाण, उपसरपंच फर्नांडिस, व्यावसायिक रमेश कद्रेकर, बाबू बिरमोळे, मनोज खोबरेकर, मुख्याध्यापक व्ही. व्ही. रावले, पोलीस पाटील भानुदास येरागी, प्रीती चोपडेकर, शर्मिला राऊळ यांच्या उपस्थितीत कर आकारणीस प्रारंभ झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पैकी केवळ किल्ले सिंधुदुर्ग या ठिकाणी प्रवासी बोटीने तिकीट आकारणी असल्यामुळे पर्यटकांची नोंद शासनदरबारी ठेवली जाते. मात्र किनारपट्टी व अन्य गावांत दाखल होणार्‍या पर्यटकांची नोंद शासनाकडे निश्‍चित स्वरूपात नसते. याबाबत शासनाने लक्ष देताना पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात पर्यटन स्थळावर येणार्‍या पर्यटकांची नोंद व्हावी तसेच पर्यटन सुविधा उपलब्ध देण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे या हेतूने १६ ग्रामपंचायत क्षेत्रात पर्यटन कर वसुलीस शासनाने परवानगी दिली आहे. यात मालवण तालुक्यातील देवबाग, तारकर्ली, तळाशील-तोंडवळी व वायरी (किल्ले सिंधुदुर्ग क्षेत्र) या चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सहलीच्या विद्यार्थ्यांना सवलत
पर्यटन कर वसुली करताना १२ वर्षांवरील ५ रुपये, १२ वर्षाखालील ३ रुपये व सहल विद्यार्थी १ रुपया प्रति व्यक्ती अशी आकारणी होणार आहे. सहलीच्या विद्यार्थ्यांना सवलत दिली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत पर्यटन कर आकारणी सुरू राहणार आहे.