बोटीतूनही पाहता येणार समुद्राखालचे सौंदर्य

अमित खोत । मालवण

सिंधुदुर्ग जिह्याची पर्यटन राजधानी असलेल्या मालवणात सागरी पर्यटनाची भुरळ देशी विदेशी पर्यटकांना पडत आहे. येथे दाखल होणाऱया पर्यटकांना नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न येथील पर्यटन व्यावसायिकांकडून नेहमीच केला जातो. त्याच धर्तीवर ‘ग्लास बॉटम बोट’ ही अनोखी सागरी पर्यटन संकल्पना चिवला बीच वॉटर स्पोर्टस्चा माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांनी साकारली आहे.

दरम्यान, समुद्र तळाशी असलेल्या सागरी सौंदर्याचा खजिना विविध प्रजातीचे मासे, शंख, शिंपले, प्रवाळ व कोरलग्लास बॉटम बोटमध्ये बसूनच पर्यटकांना पाहता येणार आहेत. नव्या वर्षाच्या प्रारंभी ही बोट पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली.

या बोटींबाबत माहिती देताना येथील पर्यटन व्यावसायिक सचिन गोवेकर यांनी कोकण किनारपट्टीवरील ही पहिलीच बोट असल्याचा दावा केला आहे. चिवला बीच येथील पिंटो रॉड्रिक्स या पर्यटन व्यावसायिक युवकाने पुढाकार घेऊन लाखो रुपये खर्चाची ही बोट मालवण चिवला किनारपट्टीवर आणली आहे. बोटीच्या तळाला काचा बसवण्यात आल्या आहेत. बोटीत बसून समुद्र सफर करत असताना काचेखालून समुद्री जगाचा आनंद लुटता येतो. गोवा राज्यासह परदेशी किनारपट्टीवर अशा प्रकारे ग्लास बॉटम बोट संकल्पना पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. चिवला बीच येथे पर्यटनवाढीच्या दृष्टीने स्थानिकांनी पुढाकार घेत लाखो रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प राबवला असल्याची माहिती गोवेकर यांनी दिली.

मुले व वृद्धांना अधिक फायदा

मालवणला येणाऱया पर्यटकांची पहिली पसंती स्कुबा डायव्हिंग असते, मात्र ऑक्सिजन सिलिंडर लावून समुद्रखाली स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटताना दहा वर्षांखालील मुले व वृद्ध यांना परवानगी दिली जात नाही. याचा विचार करता मुले व वृद्ध यांच्यासह ज्यांना पाण्यात उतरायची भीती असते अशा सर्वांना समुद्राखालील विश्व ग्लास बॉटम बोटच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.

चिवला बीचवर सर्व प्रकारचे सागरी पर्यटन
कोकण किनारपट्टीवरील चिवला बीच हा सर्वात सुरक्षित सागरी किनारा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पर्यटन व्यवसाय वाढत आहे. चिवला बीच वॉटर स्पोर्टच्या माध्यमातून स्कुबा, बोटिंग, पॅरासेलिंग व अन्य पर्यटन उपलब्ध आहे. लवकरच आंतराष्ट्रीय स्तरावर असणारे अन्य सागरी पर्यटनाची माध्यमे चिवला बीच येथे उपलब्ध करण्याचा मानस सचिन गोवेकर यांनी व्यक्त केला. तर शासनानेही सहकार्य करावे अशी अपेक्षाही गोवेकर यांनी व्यक्त केली.