हज यात्रेच्या नावाखाली 46 जणांची फसवणूक

3

सामना प्रतिनिधी । नांदेड

हज यात्रेच्या नावाखाली 11 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा गोल्डन इंटरनॅशनल टुर्स आणि ट्रव्हल्सचा मालक जाहीद मलीक आला याच्यावर दाखल झाल्यानंतर या प्रकरणात 46 जणांची 29 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नांदेड येथील मोहम्मद युनूय मोहम्मद ईस्माईल पोपटीया (45) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सप्टेंबर 2017 मध्ये गोल्डन इंटरनॅशनल टुर्स आणि ट्रव्हल्सचा मालक जाहिद मलीक आला याने सांगितले की तो हज यात्रेसाठी बुकींग करतो. यात्रेसाठी प्रत्येक व्यक्तीला 2 लाख रुपये आणि लहान मुलांसाठी एक लाख रुपये भरून बुकींग करावी लागते. पोपटीया यांनी आपल्या कुटुंबीयांचे बुकींग केले. तसेच परभणी येथील मित्र मोहम्मद इरफान, त्याची पत्नी आणि मुलीचेही बुकींग केले. त्यासाठी 5 लाख रुपये आयसीआयसीआय बँकेत भरले. त्यानंतर आणखी काही नातलगांनी हज यात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांचेही पैसे भरले. असे एकूण 11 लाख रुपये त्यांनी भरले. गोल्डन इंटरनॅशनलने 2 ऑगस्ट 2018 रोजी त्यांना पावतीसुध्दा पाठवली. मात्र, हज यात्रा संपून गेली तरीही त्यांचा नंबर लागला नाही. आपली फसवणूक झाल्याचे पोपटीया व सहकाऱ्यांच्या लक्षात आले.

गोल्डन इंटरनॅशनलचा मालक जाहीद मलीक आणि त्याचा सहाय्यक अमजद इस्तीहाख मलीक यांनी फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी इतवारा पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात 13 जानेवारीला गुन्हा दाखल केला होता. पोलीस पथकाने जाहीद मलीकला 15 जानेवारी रोजी मुंबई येथे पकडले आणि नांदेडला आणले. 17 जानेवारी रोजी त्याला न्यायालयात हजर करून गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. ती न्यायालयाने ती मान्य करत 19 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. या प्रकरणी अ‍ॅड. शेख आमेर यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात जाहीद मलीकने पोपटीयासह इतर 46 जणांची हज यात्रेच्या नावाखाली फसवणूक केली आहे. या सर्व 46 लोकांकडून पत्येकी 65 हजार असे 29 लाख 90 हजार रुपये लुबाडले आहेत. या संदर्भाने पोलिसांनी काही जणांचे जबाब नोंदवले आहेत. न्या.गवई यांनी जाहीदला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.