नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची कोकणात गर्दी

कॅशलेस थर्टी फर्स्ट

रत्नागिरी– २०१६ ला निरोप देत नव्या २०१७ वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. नोटाबंदीनंतर झालेला त्रास गिळून टाकत उद्या कॅशलेस थर्टी फर्स्ट साजरी करत अनेकजण हॅप्पी न्यू ईयर म्हणणार आहेत.

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांनी यंदाही कोकणातील समुद्रकिनार्‍यांचीच सर्वाधिक निवड केली आहे. गणपतीपुळे, हर्णै, वेळणेश्‍वर या किनार्‍यावर पर्यटकांची गेले दोन दिवस गर्दी होत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोकणामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असल्याने हॉटेल्स हाऊसफुल्ल झाले आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक हॉटेल्स आणि संस्थांनी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. पर्यटकांबरोबरच स्थानिकांनीही थर्टी फर्स्टचे विविध बेत आखले आहेत. अनेकांनी एकत्र येऊन पिकनिक स्पॉटचीही निवड केली आहे.

तळीरामांनीही थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काही विशेष पार्ट्या आणि एकांतातील ठिकाणे निवडली आहेत. उद्या जोरदार सेलिब्रेशन करून नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने एक दिवसाचा दारू पिण्याचा परवाना उपलब्ध करून दिला आहे. थर्टी फर्स्टसाठी परमिट रूम आणि बिअरबारना पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाईनशॉपी आणि देशी दारू दुकानांना मध्यरात्री १ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

डॉल्फिन पाहण्यासाठी झुंबड
गुहागर : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होत असलेल्या निसर्ग सौंदर्य लाभलेल्या गुहागरात नाताळ व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच सध्या गुहागर समुद्रात मोठ्या प्रमाणात डॉल्फीनचे दर्शन होत असल्याने स्थानिकांसह पर्यटकही चौपाटीवर ठाण मांडून बसल्याचे दिसून येते. निसर्गसौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी लाभलेल्या गुहागरची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे. प्राचीन मंदिरासह प्रेक्षणीय पर्यटन स्थळांमुळे देशी व विदेशी पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतो. शिवाय आलेले पर्यटक समुद्रात वॉटर बोटिंग घोडेस्वार सफर दाभोळ खाडीत क्रुझ फेस्टिव्हल, मोडकागर धरणामध्ये बोटिंग व्यवस्था, परचुरी खाडीत मगर सफर, सांस्कृतिक लोककला याचा आनंद लुटताना दिसत आहेत. तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांनी फुलून गेली आहेत.

हॉटेल्स हाऊसफुल
मालवण : मालवणसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांनी सार्वधिक पसंती दिल्याचे चित्र आहे. किनारपट्टी आणि विविध पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून आहेत. मालवण, देवबाग, तारकर्ली, वायरी, दांडी, चिवला यासह आचरा किनारपट्टीवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. एकूणच फुल झालेली हॉटेले पाहता हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. मालवणी माशांचे जेवणही पर्यटकांच्या अधिक पसंतीचे ठरत आहे.