कार, बाईक चोरी झाली? मग शोधा एका मिनिटात


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दररोजच्या वापरातील अतिशय गरजेच्या वस्तूंमध्ये कार, बाईक यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. वाढत्या मागणीनुसार त्यांच्या चोरीच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. या चोरीला आळा घालण्यासाठी बाजारात रियल टाईम मिनी ट्रॅकिंग डिव्हाइस आले आहे. सिक्योमोर या डिव्हाइसच्या मदतीने चोरीला गेलेल्या कार, बाईक्स यांचे रियल टाईम पोजिशन समजणार आहे.

सिक्योमोर डिव्हाइस ऑनलाईन स्टोअर्समध्ये १५७५ रूपयांत खरेदी करता येऊ शकते. या उपकरणाची खास बाब म्हणजे सिक्योमोर इंटरनेटशिवाय वापरता येऊ शकणार आहे. याद्वारे हिंदुस्थानात कुठेही लोकेशन ट्रॅक करता येऊ शकते. या डिव्हाइसची ऑनलाईन किंमत २४२९ रूपये आहे. परंतु, आता सूट मिळून १५७५ रूपयांत खरेदी करता येऊ शकते. किचेन सारख्या दिसणाऱ्या या डिव्हाइसमध्ये रिचार्जेबल बॅटरी असून ३ दिवसांपर्यंत चालणारा बॅटरी बॅकअप आहे. हे उपकरण वॉटरप्रुफ आहे. यामध्ये एक मायक्रोफोन देण्यात आला आहे. या मायक्रोफोनद्वारे डिव्हाइस जिथे असेल, तिथल्या सर्व गोष्टी आपल्या मोबाईल फोनमधून ऐकू येऊ शकतात.

सिक्योमोर (Secumore) डिव्हाइस स्मार्टफोनला कसे कनेक्ट कराल?

हे डिव्हाइस स्मार्टफोनला कनेक्ट करण्यासाठी या डिव्हाइसमध्ये एक नॅनो सिम इन्सर्ट केले जाते. त्यानंतर डिव्हाइसचे पॉवर बटण चालू करून आपल्या स्मार्टफोनमध्ये सिक्योमोर अॅप इंस्टाल करायचे. सिक्योमोर डिव्हाइसवर IMEI नंबर आणि पासवर्ड असतो त्याद्वारे लॉग इन करून रियल टाईम लोकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचे. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर डिव्हाइसचे लोकेशन ट्रॅक करणे सुरू होते. त्यानंतर मॅपवर डिव्हाइसचे लोकेशन पाहता येऊ शकते. या नॅनो डिव्हाइसने चोरी झालेली कार, बाईक शोधणे सोपे होणार असून चोरट्यांना देखील सहजरित्या पकडले जाऊ शकते.