ट्रॅक्टर पलटल्याने दोन मजूर जागीच ठार, सहा गंभीर

सामना प्रतिनिधी । नरसीफाटा

वीज वितरण कंपनीच्या कामासाठी लोखंडी पोल घेवून जाणारा भरधाव ट्रँक्टर उलटून झालेल्या अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यु झाला तर सहा मजूर गंभीर जखमी झाले आहे. जखमी मजुरांना पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले आहे. अपघातात ठार झालेले दोन्ही मजूर हे पच्छिम बंगाल मधील रहिवाशी आहेत. शनिवारी सकाळी नायगांव-नांदेड दरम्यान असलेल्या कुष्णूर एमआयडीसी जवळ हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगांव तालुक्यातील घुंगराळा परिसरातील २२० केव्ही वीज केंद्रासाठी सध्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पुढाकाराने खाजगी ठेकेदारांच्या मार्फत परिसरात लोकेशन मनोरे उभारणीचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने एका ठेकेदाराकडून परप्रांतीय मजुरांकडून ठिकठिकाणी मनोऱ्याशी निगडीत अवजड कामे करुन घेण्यात येत आहेत.

शनिवारी सकाळी १०च्या सुमारास प्रचंड मजुरांसह अवजड साहित्य व लोखंडी पोल घेवून जाणारा ट्रँक्टर कुष्णूर एमआयडीसी जवळील रामदेव धाब्याजवळ पटली झाला. ट्राँलीतील अवजड लोखंडी साहित्याचा जबर मार लागून मोहम्मद इब्राहीम व सोपान दास दोन मजुरांचा जागीच मृत्यु झाला. इंजिन व ट्राँलीचे संतुलन सुटल्याने हा अपघात झाल्याचे जखमी मजुरांनी सांगितले. दरम्यान, जखमींचा आकडा मोठा असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.