शुभ्र दागिन्यांची परंपरा!

>>ज्योत्स्ना गाडगीळ

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला आणि गोड गोड दिसा!’ मकरसंक्रांतीच्या सणाला नवदांपत्याचे आणि तान्ह्या बाळाचे कोडकौतुक करण्यासाठी हलव्याचे दागिने घालण्याची आपली परंपरा आहे. आधुनिक राहणीमान असलेल्या मुला-मुलींनाही ते दागिने घालून मिरवण्यात अजिबात कमीपणा वाटत नाही. त्याचे श्रेय जाते, आधुनिक पद्धतीने हलव्याचे दागिने बनवणाऱ्या कलाकारांना! त्यात अग्रगणी नाव घेतले जाते, पुण्याच्या पाटणकर खाऊवाल्यांचे! गेली ६० वर्षे ते हलव्याच्या दागिन्यांचा व्यवसाय करत आहेत.

हलवा काटेरी, देतो क्षण सोनेरी! लग्नानंतर संक्रांतीच्या सणाला हलव्याच्या दागिन्यांनी सजलेल्या प्रत्येक नववधूच्या अशाच भावना असतील नाही? सोन्या-चांदीच्या दागिन्यांत असतात, तसे शेकडो प्रकार आता हलव्याच्या दागिन्यांमध्येही बघायला मिळत आहेत. कारण, हा सण वर्षातून एकदाच येत असला, तरी त्यासाठी वर्षभर मेहनत सुरू असते, सांगत आहेत उद्योजिका सोनिया पाटणकर.

सोनिया पाटणकर
सोनिया पाटणकर

वीस बायका आणि दागिन्यांचे नक्षीकाम करणारे दोन कुशल कारागीर वर्षभर हलव्याच्या दागिन्यांवर मेहनत घेतात. गणपती झाले, की आणखी तीस बायकांच्या मदतीने कामाला वेग येतो आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हलव्याचे रेखीव, सुंदर आणि सुबक दागिने विक्रीसाठी सज्ज होतात. मग देशभरातूनच काय, तर जगाच्या कानाकोपऱ्यातून दागिन्यांसाठी मागणी सुरू होते, असे सोनियाजी सांगतात.

७५ वर्षांपासून ‘खाऊवाले पाटणकर’ अशी ओळख असणारे पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक पाटणकर, खाऊबरोबरच सणावाराला गरजेप्रमाणे गणेशोत्सवात शाडूच्या मूर्ती, दिवाळीत आकाशकंदील, फराळ तसेच मोदक, पुरणपोळ्या ह्यांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करू लागले. संक्रांतीच्या सणाला हलव्याच्या दागिन्यांची परंपरा जपण्यासाठी साठ वर्षांपूर्वी त्यांनी तिळावरचा हलवा बनवायला आणि त्यापासून बनलेले दागिने विकायला सुरुवात केली.

सोनियाजी सांगतात, ‘माझ्या सासूबार्इंनी हलवा बनवताना वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. तिळाचा, खसखशीचा, वरईचा हलवा बनवला. लग्नानंतर मी ह्या व्यवसायात उतरले आणि माझ्या परीने त्यात आणखी प्रयोग करून पाहिले. आता आम्ही खायचा आणि दागिन्यांसाठी वापरायचा वेगवेगळा हलवा बनवतो. संक्रांतीला जावयाला ५ प्रकारचा हलवा देण्याची प्रथा आहे, आम्ही ग्राहकांसमोर ३५ पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ज्यात भोपळ्याची बी, टरबुजाची बी, कलिंगडाची बी, चुरमुरे, बडीशेप, काजू, पिस्ता, बदाम, लवंग, वेलची असे अनेक खाण्याच्या हलव्यांचे प्रकार आहेत. तर, दागिन्यांसाठी साबुदाणा, वरई, शेवई, तांदूळ यांवर काटेरी हलवा बनवला जातो. तो हलवा वापरून दागिन्यांसाठी पाना-फुलांचे छान नक्षीकाम करता येते.’

halwa-jewellery-lady

पूर्वी ठसठशीत दागिने घालण्याची पद्धत होती. १९९५ पासून डिझायनर दागिन्यांना मुलींची पसंती मिळू लागली. ग्राहकांची आवड लक्षात घेता सोनियाजींनी हलव्याच्या दागिन्यातही तसेच बदल करून पाहिले. कुंदन , टिकल्या, झीक, वेगवेगळ्या प्रकारचे मणी, हलवा ह्यांनी युक्त असे नवीन पद्धतीचे दागिने बनवले. ते दागिने घातल्यावर कसे दिसतील, ह्याची ग्राहकांना कल्पना यावी, म्हणून दागिने घातलेले मॉडेल्सचे फोटोही काढून घेतले. मुलांसाठीही घड्याळ, पेन, मोबाईल बनवले. ते नावीन्यपूर्ण दागिने ग्राहकांच्या पसंतीस उतरले. ते दागिने घातल्यावर आपले ग्राहक कसे दिसतात, हे पाहण्यासाठी
पाटणकरांनी त्यांच्याकडून फोटो मागवले. ह्या त्यांच्या आवाहनालाही लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्राहकांनी सुनांचे, जावयाचे, बाळांचे फोटो पाठवण्यास सुरुवात केली.

हा कौतुकसोहळा लोकांसमोर यावा म्हणून २००० सालापासून त्यांनी हलव्याचे दागिने घालून सजलेल्या नवदांपत्यांचा जाहीर `कौतुक’सोहळा आयोजित केला. १७ वर्षे तो सातत्याने सुरू आहे. त्याला स्पर्धेचे स्वरूप दिलेले असले, तरी ह्या निमित्ताने आपली परंपरा रुजवणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे, असे सोनियाजी नमूद करतात. २०१५ मध्ये ‘अनुरूप जोडी’ ह्या स्पर्धेत विजयी झालेल्या पहिल्या दहा जोड्यांना रॅम्प वॉक करण्याचीही संधी पाटणकरांनी मिळवून दिली होती.

halwa-jewellery-couple

फॅशनचे चक्र सतत फिरत असते. कालपर्यंत जुन्या वाटणाऱ्या दागिन्यांना २०१२ नंतर पुन्हा मागणी आली. त्या धर्तीवर पाटणकरांनी ‘रमा-माधव’ कलेक्शन, पुढल्या वर्षी ‘जय मल्हार’ कलेक्शन बाजारात आणले. त्यात मंगळसूत्र, ठुशी, हार, नथ, कानातले, वेल, बांगड्या, तोडे, कंठी चिंचपेटी, गजरा, बाजुबंध असा भरजरी साज होता, तर पुरुषांसाठी हलव्याच्या माळांनी सजवलेला फेटा , पगडी, हार, अंगठी , भिकबाळी, उपरणे असा पेहराव होता. आजही लोक हौशीने जुन्या-नव्या प्रकारच्या दागिन्यांची मागणी करतात. तान्ह्या बाळासाठी ‘वाळा सेट’ बनवला जातो, ज्यात श्रीकृष्णाच्या पेहराव्यासकट, गळ्यातला हार, गजरे, मुकुट, बासरी, मोरपीस असते. तर, छोट्या मुलींसाठी हेअरबँड मुकुट (टियारा), माळ, हेअरपीन, कानातले, बांगड्या ह्यांचा सेट मिळतो. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी तऱ्हेतऱ्हेचे दागिने मिळतात.

मुलींची वाढती हौस पाहता हलव्याच्या दागिन्यांमध्ये आता हलव्याची सजावट केलेली साडी, हेअरक्लिप, चप्पल, पर्स ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच मुंडावळ्या आणि फुलांच्या वाडीप्रमाणे हलव्याची वाडीही विक्रीस ठेवण्यात आली आहे. तर, जावयांना त्यांच्या व्यवसायाप्रमाणे भेट देण्यासाठी- लेखकाला हलव्याचे पेन, वैमानिकाला हलव्याचे विमान, मोटरमनला हलव्याची ट्रेन असेही पर्याय उपलब्ध केले आहेत. ह्या सर्व गोष्टी वाजवी दरात उपलब्ध असल्याने एवढ्या वर्षांत पाटणकरांकडे दागिन्यांच्या विक्रीत ‘तीळ’मात्रही घट झालेली नाही. आता तर बायका तिळवणासाठी जाताना मैत्रिणीच्या सुनेला, जावयाला, बाळाला ‘भेट’ म्हणूनही हलव्याचे छोटे-मोठे दागिने घेऊन जातात.

हलव्याच्या दागिन्यांची हौस आता महाराष्ट्र किंवा भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सातासमुद्रापार जाऊन पोहोचली आहे. याबाबत सोनियाजी एक आठवण सांगतात, ‘सदावर्ते नावाच्या एका बार्इंनी त्यांच्या जपानी सुनेच्या पहिल्या संक्रांतीसाठी आमच्याकडून हलव्याचे दागिने घेऊन तिला पाठवले. ते कसे घालायचे, हे तिला कळण्यासाठी आम्ही प्रत्येक दागिन्याचा मॉडेलसह फोटो पाठवला. हौशी सूनबार्इंनी ते सगळे दागिने घालून आपला फोटो आम्हाला पाठवला आणि पुढल्या वर्षी आपल्या बाळाच्या संक्रांतीलाही दागिने मागवून त्याचा सालंकृत फोटो पाठवला. अशा पद्धतीने आपली भारतीय परंपरा ह्या सणांच्या आणि दागिन्यांच्या माध्यमातून रुजत आहे, ह्याचा आम्हाला आनंद वाटतो.’

halwa-jewellery-baby

हलवा बनवणे ही प्रक्रिया मुळातच नाजूक काम! त्याचे दागिने बनवणे आणि तयार दागिने ग्राहकाच्या हाती सुपूर्द होईपर्यंतची काळजी घेणे, हेदेखील ह्या व्यवसायातील मोठे आव्हान असते. त्याबद्दल कशी काळजी घेतली जाते, हे सोनियाजी सांगतात, ‘तयार दागिने आम्ही वर्तमानपत्रासारख्या पातळ कागदात गुंडाळतो, मग कापडात गुंडाळतो आणि नंतर प्लॅस्टिकच्या आवरणात ठेवतो. बाहेरगावी किंवा परदेशात पा’वताना प्रत्येक दागिन्याला प्लॅस्टिक आवेष्टन, बबल प्लॅस्टिकचे रॅप, जाड पुठ्याचे आवरण वरून पुन्हा बबल प्लॅस्टिकचे रॅप करून खोक्यात पॅकिंग करतो. त्यामुळे दागिने सुरक्षित राहतात व त्यांची जराही मोडतोड होत नाही. अशाचप्रकारे ग्राहकांनीदेखील दागिने काळजीपूर्वक हाताळले आणि संग्रही करून ठेवले, तर ते वर्षभर टिकू शकतात.’ अलीकडे अनेक हौशी बायका हलव्याचे दागिने करून विकतात. त्यांच्याकडे नावीन्यपूर्ण कल्पना असतील किंवा त्यांना पाटणकरांच्या उपक्रमात सहभागी होऊन काम कण्याची इच्छा असेल, तर त्यांना आम्ही निश्चित प्रशिक्षण देऊ, असे सोनियाजी सांगतात.

एका सणाने, परंपरेने, संस्कृतीने किती गोष्टी, लोक जोडले जातात, ह्याचे उदाहरण आपल्याला ह्या ‘शुभ्र दागिन्यांच्या परंपरेतून’ लक्षात आलेच असेल. तर आपणही आनंदाची परंपरा आपल्या घरातूनही रुजू द्या, त्यासाठी तीळगूळ घ्या, गोड गोड बोला आणि गोड गोड दिसा!