ट्रफिक जॅम : कोपरीकर अडवणार खासगी बसेसची ‘वाट’

सामना प्रतिनिधी, ठाणे

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस कोंडीमुळे मेटाकुटीला आलेले कोपरीकर अखेर रस्त्यावर उतरणार आहेत. या मुजोर बस चालक – मालकांविरोधात ‘कोपरी संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखाली शेकडो कोपरीकर मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी साखळी उपोषण करणार आहेत. यावेळी खासगी बसेसची वाट अडवण्यात येणार असून बसेसमुळे ऐन गर्दीच्या वेळी होणाऱ्या कोंडीतून सर्वसामान्यांची मुक्तता होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ठाणे पूर्वेच्या कोपरी येथे सात महिन्यांपूर्वी एका वृद्धाला अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसने धडक दिल्यानंतर या भागात बसविरोधी आंदोलनाने उग्ररूप धारण केले. त्यामुळे येथील सर्वच प्रकारच्या खासगी बसेसना कोपरी परिसरातून हद्दपार करण्यात आले होते. तसेच या भागातील रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला होता. त्याचवेळी ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नातही घसघशीत वाढ झाली. मात्र आधी कंपनी बसच्या नावाखाली येथील हसिजा कॉर्नरपर्यंत सुरू करण्यात आलेल्या गाड्यांसमवेत पुन्हा एकदा खासगी बसने या भागात चंचुप्रवेश केला.

त्यामुळे आंदोलनाचे अस्त्र उपसलेल्या कोपरी संघर्ष समितीला विविध यंत्रणांच्या बैठकीत आश्वासनांचे ‘गाजर’ देण्यात आले. मात्र याबाबतदेखील कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मागील महिन्यात झालेल्या बैठकीत दसऱ्यानंतर आंदोलन करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार सोमवारी कोपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या बैठकीत कोपरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण आंदोलन करण्याचे निश्चित केले.
मागे हटणार नाही…
विविध यंत्रणांनी वेळोवेळी आश्वासने दिल्यानंतर कोपरी संघर्ष समितीने आंदोलन स्थगित केले होते. मात्र या प्रकरणी कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने साखळी उपोषणावाचून पर्याय उरलेला नाही. यावेळी उपोषणाआधी पोलीस अथवा आरटीओकडून कोणतेही आश्वासन दिले तरीही आंदोलन रद्द केले जाणार नाही. याउलट उपोषणाच्या दिवशी त्या ठिकाणी लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यास त्याचा स्वीकार केला जाईल. – राजेश गाडे, सदस्य, कोपरी संघर्ष समिती.

  • खासगी बसेसचे चक्काजाम ‘स्पॉट’
  • हसिजा कॉर्नर
  • गावदेवी मंदिर परिसर
  • सिद्धार्थनगर चौक
  • स्वामी विवेकानंद चौक