नियम ‘चिरडणाऱ्या’ ५४ हजार चालकांवर दंडाचा बडगा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

नियम ‘चिरडून’ सुस्साट गाडी चालविणाऱ्या ५४ हजार ७६७ चालकांवर रायगड जिल्हा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. २०१६च्या तुलनेत २०१७ मध्ये कारवाईचे प्रमाण ४५ टक्क्यांनी वाढले असून पोलिसांच्या या धडक कारवाईने बेफाम वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

१. जिल्हा वाहतूक विभागाने १ जानेवारी ते २९ डिसेंबर २०१७ या कालावधीत ही कारवाई केली असून त्यामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २४५० जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ५३ लाख ८ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे.

२. मद्यपिंबरोबरच हेल्मेट न घालणाऱ्या १७८६ दुचाकीस्वारांवरही कारवाईचा दंडुका उगारला असून त्यांच्याकडून ८ लाख ९३ हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. या कारवाईने हेल्मेट न घालणाऱ्यांची संख्या लक्षणीय घटल्याचे समोर आले आहे.

३. वर्षभरात अवैध प्रवासी वाहतूक, ओव्हरलोडिंग, अतिवेग, धोकादायक ओव्हरटेक, प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, लेन कट, सीट बेल्ट न लावणे, टेल लाइट, अनधिकृत नंबरप्लेट, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, लायसन्स नसणे, काळ्या काचा आदी वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे.

अपघाताचे प्रमाण घटले
पोलिसांनी नियम डावलणाऱ्या वाहनचालकांविराधात जोरदार कारवाईची मोहीम उघडल्याने अपघाताचे प्रमाण घटले असल्याची माहिती जिल्हा वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांनी दिली.