तळोजात वाहतूककोंडीच्या अजगराने घेतला पोलिसाचा बळी

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

वाहतूककोंडीच्या अजगराने गुरूवारी एका वाहतूक पोलिसाचा बळी घेतला. ट्रॅफिक जामची कोंडी सोडवून परतणारे वाहतूक पोलीस अतुल घागरे यांना एका सुसाट वाहनाने चिरडले. या भीषण धडकेत घागरे यांच्या देहाचे दोन तुकडे झाले. ही घटना पहाटे तळोजा एमआयडीसीजवळ घडली. आज मुलीच्या वाढदिवशीच घागरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अज्ञात फरार वाहनचालकाचा कसून शोध सुरू आहे.

तळोजा एमआयडीसीमधील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आज पहाटे वाहतूककोंडी झाली. याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाने स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर वाहतूक पोलीस अतुल घागरे हे वाहतूककोंडी सोडविण्यासाठी घटनास्थळी गेले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर ते तळोजा एमआयडीसीतून आपल्या मोटारसायकलवरून निघाले असता अज्ञात वाहनचालकाने त्यांना जोरदार धडक देत चिरडले. यात घागरे यांचा जागीच मृत्यू झाला. धडक देणाऱ्या वाहनचालकाने त्यांना रुग्णालयात नेण्याऐवजी घटनास्थळावरून पलायन केले. आज त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. त्यासाठी ते डय़ुटी संपवून घरी निघाले. मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलीस दलात अपुरे मनुष्यबळ
अतुल घागरे यांच्या पत्नी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात काम करतात. नवी मुंबई पोलीस दलात अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे जिथे चार जणांची आवश्यकता असते तिथे एकाच पोलीस कर्मचाऱयाला काम करावे लागते. घागरे यांना या ठिकाणी एकटय़ालाच वाहतूक नियंत्रणासाठी कसे पाठविण्यात आले, याबाबत आता पोलीस दलात अनेक तर्कवितर्कांची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते अज्ञात वाहनचालकाचा कसून शोध घेत आहेत.