भारत आणि सागरच्या ‘झांगडगुत्ता’चा ट्रेलर प्रदर्शित

सामना ऑनलाईन । मुंबई

व्हिजन कॉर्पोरेशन लि. प्रस्तुत, फुटप्रिंट मिडीया एंटरटेनमेंट, पवन शेठ, मोरेश्वर संखे निर्मित, विकी हाडा सह-निर्मित आणि संदीप मनोहर नवरे लिखित दिग्दर्शित “झांगडगुत्ता” सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

यात मराठी सिनेसृष्टीमधील बरेच विनोदाचे बादशाह एकत्र काम करत आहेत. झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय शोमधील विनोदाचे एक्के सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच जयंत सावरकर, नागेश भोसले, किशोरी शहाणे, विजय कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, संजय खापरे, जयवंत वाडकर, किशोर चौगुले यांच्या विनोदाची जुगलबंदी ही तुमच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमातून एक सामाजिक प्रश्न विनोदी अंगातून दाखवला आहे. आज-काल श्रेय घेण्याच्या आणि पुतळे – स्मारकं बांधण्याच्या कुरघोडीवर, त्यांच्या मानसिकता विनोदी पद्धतीने दाखवली आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक आणि स्वयंघोषित समाजसेवक अण्णा (जयंत सावरकर) आणि गावतील त्यांचे नागरिक यांच्याभोवती सिनेमाची गोष्ट गुंफण्यात आली आहे. सर्व गाव हे अण्णांच्या सल्ल्याने चालत असते. अचानक अशी काही घटना घडते कि त्यामुळे सर्व गाव मोठ्या अडचणीत येतं… त्या अडचणीत सगळ्यांची होणारी त्रेधातिरपीट म्हणजेच झांगडगुत्ता. एकूणच ट्रेलर बघताना सगळ्यांचा होणारा गोंधळ आणि त्यातून दिलेला संदेश नक्की काय आणि कशापद्धतीने मांडला आहे हे बघण्यासाठी ट्रेलर नक्की बघा. ‘झांगडगुत्ता’ सिनेमा येत्या २१ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हिडीओ-