रुळांवरून नव्हे, रस्त्यावरून धावणारी ट्रेन

सामना ऑनलाईन । बिजींग

चीनमध्ये रुळांशिवाय धावणारी ट्रेन आली आहे. अहो, म्हणजे ही ट्रेन रस्त्यावरून धावते. हुनान प्रांतातील झुलोऊ शहरात अशी आगळीवेगळी ट्रेन नुकतीच धावली. रस्त्यावरून अन्य वाहने जशी धावतात, तशी ही ट्रेन धावेल. सध्या तिची चाचणी सुरू असून पुढील वर्षापासून ती चीनच्या रस्त्यांवर धावेल. रस्त्याच्या कडेला जागोजागी स्टेशनेही उभारली जाणार आहेत. बस आणि ट्रेन सेवेपेक्षाही ही सेवा अधिक स्वस्त असेल, असे तेथील प्रशासनाला वाटते.

बस आणि ट्रेन यांचे एकत्रित रूप म्हणजे रस्त्यावरून धावणारी ही ट्रेन. त्यातून एकावेळी ३०० जण प्रवास करू शकतात. ताशी ७० किमी असा तिचा वेग निश्चित करण्यात आला आहे. सध्या झुलोऊ शहरात नियमित ही सेवा सुरू झाल्यानंतर अन्य शहरांतही लवकरच सुरू होणार आहे.