उल्हासनगरात आयुक्तांच्या बदल्यांची संगीत खुर्ची स्पर्धा


दिनेश गोगी । उल्हासनगर

शहरात सध्या आयुक्तांच्या बदल्यांची संगीतखुर्ची स्पर्धा सुरू असून अजूनपर्यंत एकाही आयुक्ताने आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. महापालिकेच्या इतिहासात 22 वर्षांत आतापर्यंत तब्बल 40 आयुक्तांनी काम पाहिले. नव्याने आयुक्तपदाचा भार सांभाळणारे अच्युत हांगे हे आठ वर्षांतच निवृत्त होणार असल्याने पालिकेवर पुन्हा नवा आयुक्त शोधण्याची वेळ येणार आहे. आयुक्तांच्या या संगीत खुर्चीच्या खेळात मात्र विकासकामांची वाट लागली असून उल्हासनगरचा कायापालट होणार तरी केव्हा, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

1996 साली महानगरपालिकेची स्थापना झाल्यावर 22 ऑक्टोबर ते 20 डिसेंबर हे दोन महिने प्रशासक म्हणून पृथ्वीराज बायस यांनी काम पाहिले. त्यानंतर रामनाथ सोनवणे, एस. एच. शूळ, व्ही. एस. जोगळेकर, अ. द. काळे, टी. चंद्रशेखर, रा. द. शिंदे, के. पी. बक्षी, बी. आर. पोखरकर, डी. एस. पाटील, सदाशिव कांबळे, समीर उन्हाळे, अशोक बागेश्वर, अशोककुमार रनखांब, विजयकुमार म्हसाळ, बालाजी खतगावकर, मनोहर हिरे, ई. रवींद्रन, राजेंद्र निंबाळकर, डॉ.सुधाकर शिंदे, गणेश पाटील, गोविंद बोडके यांनी पदभार हाताळला.

घराघरात पाणी वेळेवर मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अस्वच्छता पूर्णतः नाहीशी करणे यासाठी योजना राबवणार असून स्वच्छ भारत अभियानात उल्हासनगर अग्रणी राहावे म्हणूनही प्रयत्न करेन. मला फक्त आठ महिन्यांचा कालावधी मिळणार असला तरी उल्हासनगरकरवासीयांची मने आपण निश्चित जिंकू. – अच्युत हांगे, आयुक्त

  • बुधवारपासून अच्युत हांगे उल्हासनगरात हजर झालेले आहेत. व्ही. एस. जोगळेकर यांनी पाचवेळा रा. द. शिंदे यांनी चारदा, रामनाथ सोनवणे, एस. एच. शूळ, अ. द. काळे यांनी प्रत्येकी तीनवेळा कारभार हाताळला.
  • सदाशिव कांबळे, मनोहर हिरे, राजेंद्र निंबाळकर, गणेश पाटील यांनी प्रत्येकी दोनदा आयुक्तपदाची जबाबदारी हाताळली आहे. यात सर्वाधिक तीन वर्षांच्या वर कालावधी हाताळण्याचा विक्रम रामनाथ सोनवणे, बालाजी खतगावकर यांच्या नावावर आहे.
  • 22 सप्टेंबर 2016 ते 16 मार्च 2017 अशा केवळ सहा महिन्यांत आक्रमक असा ठसा उल्हासनगरात उमटवणारे राजेंद्र निंबाळकर यांची बदली पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी झाल्यावर त्यांच्या जागेवर पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती झाली.