अमेरिकेत मद्यपान करून सेल्फी काढताना झाला ‘त्या’ दांपत्याचा मृत्यू

2

सामना ऑनलाईन। न्यूय़ॉर्क

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेत फिरायला गेलेल्या हिंदुस्थानी ट्रॅव्हल ब्लॉगरचा ८०० फूट उंच कड्यावरून पडून मृत्यू झाला होता. मात्र या मृत्यूचे कारण समजले नव्हते. नुकताच त्यांच्या अॅटोप्सीचा अहवाल मिळाला असून त्यात मृत्यू झाला तेव्हा हे दांपत्य मद्याच्या नशेत असल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकेतील योसमिते येथील आयकोनिक टाफ्ट या उंच कड्यावर सेल्फी घेत असताना मीनाक्षी मूर्ती (30) आणि विष्णु विश्वनाथ (29) हे दांपत्य खाली कोसळले. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. मीनाक्षी आणि विष्णु ट्रॅव्हल ब्लॉगर होते. तसेच अमेरिकेत ते इंजीनियरिंगचा अभ्यासही करत होते. दोघेही जण सोशल साईटवर सक्रीय होते. Holidays and Happily Ever Afters नावाचे इन्स्टाग्राम अकाऊंट ते चालवायचे. ज्या कडयावरून कोसळून त्यांचा मृत्यू झाला. त्याच कड्यावर त्यांनी लग्नाआधीही फोटो काढले होते. ते त्यांनी सोशल साईटवर पोस्टही केले होते. त्यानंतर आता ते दुसऱ्यांदा त्याच कड्यावर पुन्हा फिरण्यासाठी आले होते. सेल्फी काढण्यासाठी त्यांनी कड्यावर ट्रायपॉडही ठेवला होता. त्यात सेल्फी घेत असताना दोघांचा तोल गेला व ते ८०० फूट खोल कोसळले. फिरण्यासाठी गेलेले दांपत्य घरी परत न आल्याने त्यांच्या निकटवर्तीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता. नुकताच त्यांच्या अॅटोप्सीचा अहवाल मिळाला असून त्यात मृत्यूसमयी दोघेजण मद्याच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. सेल्फी काढताना दोघांनी मद्यपान केले असावे त्यामुळेच कड्यावर उभे असातना त्यांचा तोल गेला असावा असे पोलिसांनी सांगितले आहे.