फिरायला जाण्यासाठी पॅकिंग करताय? मग अशी करा तयारी

सामना ऑनलाईन । मुंबई

कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून बाहेरगावी फिरायला जाणं प्रत्येकालाच आवडतं. लहान मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. तसेच मे महिना जस जसा जवळ येत आहे तसे फिरायला जाण्याचे विविध बेत आखले जात आहेत. कुठे फिरायला जाणार यासोबतच फिरायला जाताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पॅकिंग. पॅकिंग करताना कोणत्या गोष्टी आठवणीने सोबत घ्याव्यात तसेच कोणत्या नाही हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर पॅकिंगच्या काही टिप्स देऊन थोडी मदत करणार आहोत.

– फिरायला जाताना सामानासाठी तुम्हाला उचलायला सोपी पडेल अशीच बॅग निवडा. बऱ्याचदा आपण मोठ्या बॅगेचा वापर करतो. मात्र प्रवासादरम्यान जड बॅग घेऊन प्रवास करणं अवघड होऊन जातं.

– कधी कधी फिरायला जायचं या आनंदाच्या भरात आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आणि वस्तू सोबत घेतो. मात्र नंतर त्यातले नेमके कोणते परिधान करायचे, कुठल्या वस्तू कोठे आहेत यासारखे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आवश्यक तेवढ्या वस्तू सोबत घ्या.

– उन्हाळ्यात उन्हापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीम, लोशन, गॉगल्स या गोष्टी सोबत न्यायला विसरू नका.

– फिरायला जाण्यासाठी तुम्ही जे ठिकाण निवडलं असेल त्याला तसेच तेथील वातावरणाला अनुरूप ठरेल असेच कपडे सोबत घ्या.

– खाण्यापिण्याच्या भरपूर वस्तू सोबत नेण्याऐवजी फिरायला जाताना गरजेपुरताच थोडासा सुका खाऊ सोबत घ्या.

– प्रवास करताना बऱ्याचदा मोबाईलचा वापर केला जातो त्यामुळे चार्जर, स्पेअर बॅटरीजसुद्धा आठवणीने सोबत ठेवा.

– फिरायला जर तुम्ही एखाद्या समुद्रकिनारी जाणार असाल तर स्विम सुट किंवा शॉर्ट्स जरूर सोबत घ्या.

– प्रवासादरम्यान अनेकदा चप्पल, सॅण्डल तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे फिरायला जाताना स्पोर्टस शूजसोबत घ्या.

– फिरायला जाताना दागिने किंवा मौल्यवान वस्तू आपल्यासोबत नेणं टाळा. प्रवासादरम्यान त्या कधी कधी हरवण्याची शक्यता असते.

– प्रवासादरम्यान कधी कधी वातावरणात बदल झाल्याने आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याने काही औषधं सोबत घ्या.

– फिरायला गेल्यानंतर तिथली धमाल मजा-मस्ती, आठवणी कायम लक्षात राहाव्यात यासाठी आपण खूप फोटो काढतो. त्यामुळे कॅमेरा घ्यायला विसरू नका. तसेच कॅमेऱ्याची बॅटरी आणि चार्जर सोबत घ्यायला विसरू नका.