पसंतीची सीट पण जादा पैसे देणार नाही! विमान प्रवाशांची भूमिका

सामना प्रतिनिधी । मुंबई

विमान प्रवास म्हटलं की प्रत्येकाचा उत्साह द्विगुणीत होतो. या प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवासी आपल्याला पसंतीची सीट मिळावी म्हणून हट्ट धरतात. मात्र पसंतीच्या सीटसाठी जादा पैसे मोजण्यास त्यांच्याकडून नापसंती दर्शविली जात असल्याचे एका सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले आहे. विमान प्रवासासाठी तिकीट बुक करताना प्रवासी जादा पैसे मोजून आपल्या पसंतीची सीट बुक करू शकतात, असे इंडिगो या विमान कंपनीने नुकतेच स्पष्ट केले आहे.

त्यावरून प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर एका संस्थेने नुकताच सर्व्हे केले असून 41 टक्क्यांहून अधिक प्रवाशांनी पसंतीच्या सीटसाठी जादा पैसे मोजण्यास नकार देत उपलब्ध असलेल्या सीटवर बसू असे स्पष्ट केले आहे. तर चांगली सीट मिळावी म्हणून आम्ही लवकर बोर्डिंग काऊंटरवर पोहचू असे 24 टक्के प्रवाशांनी सांगितले. सध्या व्हीआयपींना देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान पसंतीची सीट दिली जाते.