एकच माझा सह्यकडा

बाळ तोरसकर, [email protected]

शिवरायांच्या गनिमीकाव्यांचा एक भाग असलेले गिर्यारोहण आज आपल्यासमोर खेळ म्हणून समोर येते

छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी अनेक गडकिल्ले सर केल्याचे आपणांस माहीत आहेच. तानाजी मालुसरे व त्यांच्या मावळ्यांनी सिंहगड काबीज करताना रात्रीच्या वेळी चाल करत उभा कडा सर केल्याचे व जिंकल्याचे आपणांस माहीतच आहे. महाराष्ट्रात गडकिल्ले भरपूर असल्याने कित्येक जण आजही गड सर करण्यासाठी सहली काढतात व सर करतात, उंच उंच शिखरे चढतात. त्यातूनच पुढे आलेला खेळ म्हणजे प्रस्तरारोहण (गिर्यारोहण). गिर्यारोहण प्रकार तसा सर्वांनाच माहीतचा आहे. मात्र या प्रकाराला प्रस्तरारोहण असे नाव देत हा खेळ जन्माला आला आहे. ‘छोटा चेतन’ चित्रपटात छोटा चेतन भिंतीवरून चालल्याचेसुद्धा आपण पाहिले असेलच. मात्र ती जादू प्रत्यक्षात आपण शिकू शकतो ती प्रस्तरारोहण या खेळात.

प्रस्तरारोहणास खेळ म्हणून पुढे आणले ते फ्रान्स या देशाने. युरोपातील याच देशाने नुकतेच रशियात पार पडलेल्या फुटबॉलच्या विश्वचषकावर नाव कोरले आहे. याच देशाने प्रस्तरारोहण या प्रकाराला खेळ म्हणून मान्यता मिळवून दिली. १९८०-९० च्या दशकात प्रस्तरारोहणाला खेळ म्हणून पुढे आणताना त्याला राजमान्यतासुद्धा मिळवून देण्यासाठी खूपच प्रयत्न केले. त्यामुळेच हा खेळ आज जगभरात जवळ जवळ १०० ते १५० देशांत खेळत असल्याचा दावा या खेळाचे कार्यकर्ते करतात. हा खेळ साधारण १९९५ साली हिंदुस्थानात आल्याचे सांगितले जाते. हा खेळ तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे  व हिंदुस्थानात पसरवण्यासाठी  भारतीय पर्वतारोहण संस्थेने मोलाचे कार्य केले आहे. हा खेळ संपूर्ण हिंदुस्थानात पसरवण्यासाठी त्यांनी हिंदुस्थानचे सहा विभाग केले आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य व व्यावसायिक विभाग असे हे सहा विभाग आहेत. अतिपूर्व-उत्तर (ईशान्य) भागातील राज्यांना चांगली संधी मिळावी म्हणून त्यास एक वेगळा दर्जा दिला गेला आहे. त्याचबरोबर विविध आस्थापनांत काम करणारे खेळाडू आपली वेगळी छाप पाडतील. त्यासाठी व्यावसायिक हा वेगळा विभाग केल्याचे लक्षात येते.

या खेळात सब-ज्युनियर, ज्युनियर व खुला गट अशा तीन विभागांत स्पर्धा आयोजित केली जाते. याव्यतिरिक्त युथ-अ १६ ते १७ वर्षे व युथ-ब १४ ते १५ वर्षे वयोगटासाठी असलेल्या खेळाडूंसाठी स्पर्धा आयोजित केली जाते. सब-ज्युनियर गटात १०ते १४ वर्षे या वयोगटातील खेळाडू, ज्युनियर गटात १८ ते १९ वर्षे या वयोगटातील खेळाडू तर खुल्या गटात १६ वर्षांवरील कोणतेही खेळाडू या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. आज जरी वेगवेगळ्या राज्य संघटना हिंदुस्थानात उपलब्ध नसल्या तरी सहा विभागांतून सर्वोत्कृष्ट खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतात. जवळ जवळ २० राज्यांमधून खेळाडू या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतात. त्यातूनच आशियाई व जागतिक स्पर्धेसाठी खेळाडू निवडले जातात. या खेळाचा होत असलेला प्रचार प्रसार पाहता हिंदुस्थाननेसुद्धा २००४ साली उत्तरांचल व २०११ साली मणिपूर येथे आशियाई स्पर्धांचे आयोजन केले होते, तर महाराष्ट्रात सलग दोनवेळा २०१६  व २०१७ साली वेगवेगळ्या गटांच्या विश्वचषकाचे सामने नवी मुंबईत आयोजित केले होते.

प्रस्तरारोहणामध्ये काठिण्य, द्रुत व बोल्डर (सुळके चढणे) असे वेगवेगळे प्रकार या खेळात आहेत. त्यासाठी कृत्रिम भिंती वापरल्या जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर फायबर वॉल वापरल्या जातात तर इनडोअर प्रकारात प्लायपासून बनवलेल्या भिंती वापरल्या जातात. काही ठिकाणी यापेक्षा वेगळ्या साहित्याने भिंती उभारल्या जातात, परंतु या भिंती धोकादायक ठरू शकतात. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, कोल्हापूर, नाशिक, सातारा आदी १० ते १२ जिल्हे प्रस्तरारोहण या खेळात अव्वल असल्याचे बोलले जाते. मुंबईत दादरच्या श्रीसमर्थ व्यायाममंदिर, सचिवालय जिमखाना, पेटिट हायस्कूल, पोदार महाविद्यालय, अमेरिकन इंटरनॅशनल स्कूल, कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल, नंदादीप शाळा गोरेगाव, ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल आदी ठिकाणी प्रस्तरारोहण या खेळासाठी आधुनिक कृत्रिम भिंती वापरल्या जातात. महाराष्ट्रात हा खेळ वाढवण्यासाठी मुंबईचे आणि पश्चिम विभागाचे अध्यक्ष सोराब गांधी व आंतरराष्ट्रीय पंच अजित कुशे हे जोमाने प्रयत्न करत आहेत.

काठिण्य या प्रकारात कृत्रिम भिंतीवर पहिला हूक १० फुटांवर असतो व त्यानंतर प्रत्येक ५ फुटांवर हूक बसवलेले असतात. खेळाडूच्या कमरेत असलेल्या पट्टय़ातील दोरी या प्रत्येक हुकात अडकवत वरवर चढत जायचे. जवळ जवळ १५ फुटांची कृत्रिम भिंत या स्पर्धेसाठी वापरली जाते व जो सर्वात कमी वेळेत ही भिंत चढेल तो विजेता ठरतो. द्रुत खेळ प्रकारात अतिशय वेगाने ही भिंत चढणे आवश्यक असते, तर बोल्डर प्रकारात कृत्रिम भिंतीवर असलेल्या ६ ते ७ मीटरवर असलेल्या छोटय़ा सुळक्यांवर चार मिनिटांच्या आत चढायचे व त्यानंतर चार मिनिटांची विश्रांती असे चार ते सहा सेट करायचे असतात. जर हा सुळका चार मिनिटांपेक्षा कमी वेळात पार केला तर तो उरलेला वेळ व विश्रांतीचा चार मिनिटांचा काळ हा संपूर्ण विश्रांती काळ ठरवला जातो. जो खेळाडू कमी वेळेत व कमी प्रयत्नांत हे बोल्डर पार पाडेल तो खेळाडू या स्पर्धेत विजेता ठरतो. यासाठी स्पर्धेत खेळाडूंना इजा होऊ नये म्हणून प्रत्येक भिंतीखाली एक मीटर उंचीची गादी ठेवली जाते.

आनंदाची बाब म्हणजे २००८ पासून हा खेळ ऑलिंपिकमध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते व त्याला २०१६ साली मान्यता देण्यात आली असून २०२० च्या जपान येथे होत असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत या खेळाचा समावेश होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय पंच अजित कुशे यांनी सांगितले आहे.