सह्याद्री Treks

6

>> रतिंद्र नाईक  

सह्याद्रीतल्या थंडीची मजाच न्यारी. हे दिवस म्हणजे भटकायचे… चांगलेचुंगले, पौष्टिक खायचे… चला तर मग… तरुणाई… भटकायला सह्याद्रीत!! 

मानस तीर्थधाम

मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगाव स्थानकापासून 15 मिनिटांच्या अंतरावर मानस तीर्थधाम आहे. मानस तीर्थधाम हे एक जैन मंदिर असून एका टेकडीवर ते वसले आहे. मंदिराव्यतिरिक्त येथील हिरवळ प्रदेश, तेथील शांतता शहरात मिळणे तसे कठीणच आहे. थंडीच्या कालावधीत आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी नक्कीच भेट देता येईल. देवदर्शनाबरोबरच तेथील निसर्गाचा आस्वाद घेता येईल.  

कर्नाळा

रंगीबेरंगी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले कर्नाळा अभयारण्य पनवेलपासून
30 मिनिटांच्या अंतरावर आहे. या ठिकाणी थंडीच्या मोसमात विविध पक्षी पाहायला मिळतील. शिवाय जंगलातील पक्ष्यांचे आवाज, येथील हिरवळ, वन्यप्राणी पाहण्यासाठी कर्नाळा अभयारण्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो. पहाटेच्या गारव्यात कर्नाळ्यातील जंगलात भटकंती करणाऱयांना शहराच्या तुलनेत थंड वातावरणाचा वेगळा अनुभव घेता येईल.

माथेरान

मुंबई-पुण्यापासून काही तासांच्या अंतरावरच वसलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रचलित आहे. बारमाही थंड हवेचा प्रदेश त्यातच हिवाळा ऋतूची भर यामुळे येथे अतिथंड वातावरण अनुभवता येते. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस शेकोटीची मजा काही औरच आहे. नेरळ स्थानकापासून माथेरानला जाण्यासाठी मिनीट्रेन अथवा खासगी गाडय़ांचा पर्याय उपलब्ध असला तरी पायी ट्रेकिंगद्वारे माथेरानपर्यंत पोहोचण्यात वेगळेच थ्रील आहे.

किहीम समुद्रकिनारा

रायगड जिह्यातील अलिबागजवळच किहीम समुद्रकिनारा आहे. या किनाऱयावर पर्यटकांची तशी नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. परंतु थंडीच्या कालावधीत समुद्रातील गारवा येथे फिरायला येणाऱया प्रत्येकाला रिफ्रेश करतो. सकाळी किंवा सायंकाळी जॉगिंग करायला येणाऱया नागरिकांना थंड वातावरणामुळे कमी प्रमाणात थकवा जाणवतो. शिवाय किनाऱयावर व्हॉलीबॉल अथवा इतर वॉटर स्पोर्टस्चाही आनंद पर्यटकांना घेता येईल.

कान्हेरी गुंफा

मुंबईत वसलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्राचीन कान्हेरी गुंफा आहेत. या ठिकाणी इतर अनेक लहान मोठय़ा हिरव्यागार टेकडय़ा असून त्या ट्रेकर्सना आकर्षित करतात. घनदाट जंगल, हिरव्यागार निसर्ग आणि थंड वातावरणात कान्हेरी गुंफांपर्यंत सायकलिंग करण्याची मजा औरच आहे. सायकल अथवा वाहनाद्वारे येथील कान्हेरी गुंफांपर्यंत पोहोचता येईल.  

किल्ले रायगड

कोकणचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱया किल्ले रायगडावर दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पाचाड गावापासून साधारण अडीच किलोमीटर अंतरावर किल्ले रायगड वसले आहे. गडावर चढण्यासाठी 1400 पायऱया आहेत. शिवाय रोपवेही आहे. थंडीच्या मोसमात चढताना वेगळाच हुरूप मिळतो. याशिवाय गड चढतेवेळी नेहमीपेक्षा कमी थकवा जाणवतो.